श्रावणातल्या कहाण्यांमधल्या आटपाट नगराच्या गोष्टी काळाआड गेल्या आहेत, कारण आता त्या आटपाट नगराची जागा आपल्याच शहरानं घेतली आहे. कहाण्यांमधलं ते आटपाट नगर जसं जुनं, आठवणीतलं, गोष्टींमध्येच शोभणारं, तसंच आपल्याला आठवणारं आपलं शहर, त्या शहरातली माणसं आता गोष्टींमध्येच शोभतील अशी. आपल्या या शहराची आठवण काही फार वर्षांपूर्वीची नाही. अगदी अलिकडची... म्हणजे साधारण 10 वर्षांपूर्वीची. पण तरीही शहरानं गेल्या दहा वर्षांमध्ये संपूर्ण कात टाकली आहे.
गल्लोगल्ली दिसणाऱ्या चार चाकी गाड्या, त्या गाड्यांमधून फिरणारी, एकाच प्रकारचे कपडे घालणारी, एकाच प्रकारची, कोणतीशी वेगळीच, भाषा बोलणारी, अगदी जाहीरातींमधून थेट शहरातल्या रस्त्यांवर आल्याप्रमाणं दिसणारी, सगळीकडे कमालीच्या आत्मविश्वासानं वावरणारी माणसं, पंचतारांकित शॉपिंग मॉल्सची आणि तिथे शॉपिंग करणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी, फ्लॅट्सचे गगनाला भिडलेले भाव आणि तरीही स्कीम लॉंच होण्याचा अवकाश- संपून जाणारं बुकिंग. ब्रॅंडेड कपड्यांची, ब्रॅंडेड फर्निचरची, ब्रॅंडेड जेवणाची, इन-फॅक्ट ब्रॅंडेड जीवनशैलीचीच लागलेली किंवा लागू पाहणारी सवय. हे सगळे बदल नजरेत भरतील इतके ठळकपणे समोर आले आहेत. अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोचले आहेत, गेल्या सात-आठ-दहा वर्षांमध्ये !
का बदललं इतकं सगळं, इतक्या झपट्याने ? मला वाटतं आपल्यातल्या प्रत्येकाला याचं उत्तर माहीती आहे. आय.टी. हा कळीचा शब्द जेव्हापासून मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये जाऊन बसला, तेव्हापासून हे सगळं घडायला सुरूवात झाली. आणि आजची स्थिती तर कोणालाही लपलेली नाही. असं म्हणतात, की पंजाबमध्ये घरटी एक माणूस सैन्यदलामध्ये असतो. तसंच महाराष्ट्रामध्ये घरटी एक माणूस आय.टी. मध्ये असतो असं म्हणता येईल. आय.टी. मध्ये काम करणाऱ्यांची आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचीच जीवनशैली – अगदी स्वयंपाकघरापासून ते कपड्यांपर्यंत उंचावली आहे. अगदी अनपेक्षितपणे आणि नकळत घडलेले हे बदल आता ठळक झालेत.
काय आहेत हे बदल ?
· पारंपरिक काळ्या कडप्प्याचं स्वयंपाकघर जाऊन मॉड्युलर किचन आलं.
· फ्रिजम्ध्ये लो-कॅलरी फुड आयटम्स आले.
· मंडईमधून आणलेल्या भाज्यांपेक्षा स्पेन्सर्स, रिलायन्स फ्रेशिज, किंवा मोअर मधून आणलेल्या, निवडलेल्या, ब्रॅंडेड भाज्याच घरामध्ये येऊल लागल्या.
· बाथरुम्स मध्ये हॉट आणि कूल शॉवर्स, आणि बाथ टब्स या गरजा बनल्या.
· लिव्हींग रुममध्ये इटालियन फर्निचर आलं.
· फ्रेंच विंडोज आल्या.
· पार्किंगला स्मॉल कारशिवाय शोभा येईनाशी झाली.
· नवरा-बायको दोघांनाही कारची गरज भासू लागली. एक कार पुरेनाशी झाली.
· त्या स्मॉल कारमध्ये सोनी चे स्पीकर्स आणि म्युझिक सिस्टिम आली.
· स्वतःच्या नोकिया एन सिरीज चा चार्जरही कारमध्ये आला.
· किमान एक आय पॉड स्वतःकडे असणं गरजेचं झालं.
· कपाटात--- सॉरी वॉर्डरोबमध्ये लिव्हाईज, ली, स्पायकर च्या जीन्स, रीबॉक, आडिडास, मंत्रा चे टी-शर्ट्स आणि काही ब्रॅंडेड फॉर्मल्स अनिवार्य झाले.
· शहरातल्या किमान एका तरी जिम किंवा क्लबची मेंबरशिप मस्ट झाली.
· मद्यपान करणे हे पाप समजलं जाणाऱ्या घरांमध्ये सोशल ड्रिंकिंगला मान्यता मिळाली, किंबहुना तो स्टेटस सिंबॉल समजला जाऊ लागला.
· मुलांच्या प्री-नर्सरीच्या नावावरुनच जणू त्यांच्या पुढच्या करिअरचं मोजमाप होऊ लागलं.
चैनीच्या, ऐषारामाच्या सर्व गोष्टी गरजा बनत गेल्या. ऐटीत जगण्याची सवय लागली. कारण आय.टी. मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ही ऐट परवडायला आणि सोसायला लागली. ही सगळी “ऐटीत जगणारी माणसं” झाली.
100 वर्षांपूर्वी केशवसूतांनी एक कविता लिहीली होती. संपूर्ण जगामध्ये लीलया संचार करण्याचं, दिशा-काळ-वेळेचं बंधन झुगारुन त्या पलिकडची सृष्टी पाहू शकण्याचं सामर्थ्य कवी नावाच्या प्राण्यामध्ये आहे असं सांगणारी ही कविता होती. मला वाटतं, ही कविता आजच्या काळात तंतोतंत लागू पडते आहे, ऐटीत जगणाऱ्या या माणसांना....
आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके
देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळावया
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहींकडे लीलया
दिक्कालातून आरपार आमुची दृष्टी पहाया शके
तर अशा या ऐटीतल्या माणसांबद्दल सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न, अनेक शंका, क्वचित मत्सर, क्वचित कीव, क्वचित अभिमान, क्वचित उत्सुकता असं बरंच काही आहे. सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा म्हणजे नक्कीच खूप हुशार – अगदी जिनियस - असा समज काही वर्षांपूर्वीपर्यंत होता. पण आता लोकांचा तसा समज नाही. कारण या क्षेत्रामध्ये संधी वाढल्या आणि मोठ्या संख्येने मनुष्यबळ या क्षेत्रामध्ये येऊ लागलं. त्यामुळे हळूहळू लोकांच्या हे लक्षात आलं, की जिनियस असणं ही गरज इथे नाही. परंतु माहीतगार असणं ही गरज मात्र आहे. त्यामुळे या क्षेत्रामधल्या शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आकर्षिले गेले आणि मग सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्यांची एक मोठी फळीच तयार झाली.
एम्प्लॉयमेंट एक्सेंजमध्ये रांगा लावण्याचा काळ आणि गरज केव्हाच मागे पडली. कारण सॉफ्टवेअरच्या या जादुई दुनियेतल्या कोणत्याही एका कुलुपाची चावी तुमच्याकडे असल्याचं तुम्ही जाहीर करायचा अवकाश – संधी तुमच्याकडे चालून येऊ लागल्या. संगणकाच्या क्षेत्राने भारतामध्ये जोम धरला ते साधारण 90 च्या दशकामध्ये. डॉट कॉम हा शब्द आणि त्याबरोबरच इंटरनेट नावाची एक नवीन दुनिया या काळात आपल्याला खुली झाली. मोठ-मोठ्या शहरांमध्ये डॉट कॉम कंपन्यांचे बॅनर्स दिसू लागले आणि शहरांमधल्या मुख्य रस्त्यांवर इंटरनेट कॅफेज दिसू लागले. काय आहे इंटरनेट, काय करतात डॉट कॉम कंपन्या, आपण वेब ब्राऊजिंग केल्यामुळे त्यांना पैसे कसे मिळतात, या कंपन्यांचं नेमतं Revenue Model काय, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. पण त्या सर्वांची उत्तरं मिळायच्या आतच हा डॉट कॉम चा फुगा फुटला. 1990 च्या दशकामधलं डॉट कॉमचं वारं अगदी सामान्य माणसांपर्यंत पोचलेलं नव्हतं. त्यामुळे डॉट कॉम चा फुगा फुटल्यानंतरची झळसुद्धा अगदी वैयक्तिक पातळीवर तशी मोठ्या प्रमाणावर बसली नाही. पण 1999 नंतर आलेली आय.टी.ची लाट मात्र वेगळीच होती. डॉट कॉम च्या अपयशाबद्दलचे तपशील माहीत नसले, तरी ढोबळ मानाने संगणकाच्या क्षेत्राचं काही खरं नाही इतपत माहीती सामान्य माणसांना होती. त्यामुळे सुरूवातीला या क्षेत्रामध्ये जायला तसा सामान्य माणूसही कचरत होताच.
पण इन्फोसिस, विप्रो सारख्या भारतीय कंपन्यांनी डॉट कॉम चा बोळा काढला आणि पाणी वाहतं झालं. आऊटसोर्सिंगच्या गणितामुळे भारताला होऊ शकणाऱ्या फायद्याची झलक या कंपन्यांनी दाखवली मात्र- अनेक हुशार लोक या क्षेत्राकडे केवळ नोकरीची संधी म्हणूनच नाही तर एक आव्हान म्हणूनही बघू लागले. कुठेच काहीच घडत नसल्याची तक्रार करणाऱ्या मध्यमवर्गाला, आपल्याकडे असलेलं कष्टाचं आणि शिक्षणाचं भांडवल वापरुन यश मिळवण्याचा मार्ग सापडला आणि मग सगळं चित्रच बदललं.
माझी पिढी या सगळ्या बदलांची साक्षीदार असणारी. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठीपणापासून ते कॉस्मो कल्चर पर्यंतचा प्रवास माझ्या पिढीने नकळतपणे केला. आता दहा वर्षांनतर हे सगळं बरंचसं स्थिरस्थावर झालं आहे. अंगवळणी पडलं आहे.
मी देखिल गेली पाच वर्ष रोज 12 तास आय.टी. च्या फाईव्ह स्टार वातावरणात घालवते आहे. आजुबाजुचे लोक, नातेवाईक, इतर नॉन-आय.टी. वाले मित्र यांच्या प्रश्नांना, शंकाना, उत्सुकतेला, कधी कधी कौतुकभरल्या नजरेला तोंड देते आहे. मग लक्षात यायला लागलं, की हे जे सगळं घडतंय ते सर्वांनाच काहीतरी नवीन, निराळं वाटतंय. म्हणून लिहावंसं वाटलं. कोणत्याही आय.टी. कंपनीच्या ऑफिसमध्ये मध्ये दररोज घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी – मधुर भांडारकर च्या कॉंर्पेरेटच्या पटकथेमधून उचलल्यासारख्या -, आय.टी. मधल्या लोकांची बदलत चाललेली भाषा, हाती लवकर आलेल्या परचेसिंग पॉवर मुळे त्यांच्या कुटुंबामध्ये झपाट्याने होणारे बदल, नातेसंबंधांमध्ये होणारं परिवर्तन... असं बरंच काही टिपून ठेवावं असं वाटलं. हे सगळं नोंदवून ठेवावंसं वाटण्याचं कारण असं, की संवाद-माध्यमांमध्ये (कम्युनिकेशन मिडिया) ज्या ज्या वेळी काही मोठे बदल झाले त्या त्या वेळी त्या काळातली एक पूर्ण पिढी त्या वेळच्या समाजाची जीवनशैली बदलवून टाकायला कारणीभूत ठरली. संवाद-माध्यमांमधली क्रांती रोज होत नाही. म्हणूनच ती जेव्हा होते, तेव्हा तिचे परिणाम मोठ्या प्रमाणावर असतात.
हे सगळे परिणाम वृत्तान्ताच्या स्वरुपात लिहावेत असं वाटलं. बुलेटिन बोर्ड सारखे.
आय.टी. बुलेटिन बोर्ड म्हणजे या क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्या व्यावसायिक संधीची माहिती नाही किंवा भारतामध्ये नव्याने येऊ पहाणाऱ्या नवनवीन कंपन्यांची माहिती देण्याचाही उद्देश इथे नाही. हा प्रयत्न संपूर्णपणे इथे काम करणाऱ्या माणसांचं मनोगत मांडण्याचा. पण तरीसुद्धा ही लेखमालिका म्हणजे आय.टी.मध्ये काम करणाऱ्या माणसांची कैफियत किंवा त्यांच्या कष्टाची कहाणी, किंवा गार्हाणं नाही. त्याचबरोबर, आय.टी. ला विनाकारण महत्त्व देऊन इथे काम करणाऱ्या सर्व ऐटीतल्या माणसांना कुठेतरी एक्स्ट्रा-ऑर्डिनरी बनवण्याचाही उद्देश नाही.
याला वृत्तान्त म्हणता येईल. या इंडस्ट्रीमध्ये काम करताना जे जसं दिसतं, जे नवीन जाणवतं, वेगळं वाटतं, ते तसंच्या तसं शेअर करण्याचा प्रयत्न.
इथून पुढच्या लेखांमध्ये काही प्रसंग, काही मजेशीर किस्से, काही अनुभव असं सगळं येईलच. पण तत्पूर्वी बुलेटन बोर्डच्या पुढच्या भागात, या इंडस्ट्रीच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा एक गोषवारा घेऊयात.
Thursday, April 3, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment