Thursday, April 3, 2008

Column in Saptahik Sakal

माझ्या एका नॉन-आय.टी. वाल्या मित्राच्या भाषेत सांगायचं, तर हे सगळे सॉफ्टवेअरडे किंवा कॉम्प्युटरडे किंवा आय.टा.डे रिकामटेकडे आहेत. म्हणूनच त्यांना इतकं सगळं महागडं शॉपिंग करायला, इतक्या ठिकाणी आऊटिंगला जायला आणि असंच काय काय करायला वेळ मिळतो. या आय.टी. बद्दल असे टोकाचे विचारप्रवाह दिसतात.

एक आय.टी.ला संपूर्ण विरोध करणाऱ्यांचा. हा प्रवाह म्हणतो, की या क्षेत्रामुळे आपण आपली identity हरवली. या क्षेत्राने आपल्याला चैनीची सवय लावली. आपली संस्कृती विसरायला लावली आणि आपण पाश्चिमात्यांच्या संपूर्णपणे आहारी गेलो.

दुसरा प्रवाह आय.टी.चा संपूर्ण पुरस्कार करणाऱ्यांचा. हा प्रवाह म्हणतो, की आय.टी.मुळे आपण आधुनिक झालो. आपल्याला जगाची आणि जगाला आपली ओळख झाली. मध्यमवर्गाला पुन्हा एकदा चांगले दिवस आले. जगाच्या नकाशावर भारताचं अस्तित्व या काळात आय.टी. मुळेच पुन्हा एकदा जाणवू लागलं.

हे दोन्ही विचार खरं म्हणजे एकच गोष्ट सांगतात. ते परस्पर विरोधी नाहीतच. कारण तंत्रज्ञान विकसित होतं त्यामुळे सपाटीकरणाची प्रक्रिया जोम धरते. जितका जास्त जगाशी संपर्क येतो, तितकी जास्त देवाण-घेवाण होते आणि मग स्वतःचं वेगळं काही बाळगणं मुश्कील होऊन बसतं. जसं शाळेत एकदा गेलं, की शाळेचा गणवेष घालणं अपरिहार्य असतं. आपण एकटेच गणवेश न घालता, आपल्याला हवा तो पोशाख करुन जाऊ शकत नाही. तसंच आहे हे. या बद्दल खूप सविस्तरपणे पुढच्या लेखांमध्ये बोलूच. पण त्यापूर्वी मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे आय.टी. क्षेत्राच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा गोषवारा...

तरुणाई
या इंडस्ट्रीचं तरुण वय तर कोणापासूनही लपलेलं नाही. भारतात या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळाचं सरासरी वय आहे केवळ 26 वर्ष. पारंपरिक क्षेत्रांमध्ये एखाद्या कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचं वय कमीतकमीत 50 असणं गरजेचं. कारण कदाचित ही सर्व क्षेत्र अनुभव आणि गुडविल च्या जोरावर चालणारी असावीत. पण या क्षेत्रामध्ये मात्र अनुभवापेक्षाही नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानाची झेप कुठवर जाईल याची दृष्टी असणं गरजेचं. आणि ती दृष्टी असण्यासाठी वयाची कोणतीच बंधनं लागू होत नाहीत. गुगल हे याचं सर्वोत्तम उदाहरण सर्वज्ञात आहेच.

अनौपचारिकता
कपड्यांमधली, वातवरणातली, एकमेकांशी संवाद साधण्यामधली अनौपचारिकता हे तर या क्षेत्राचं ठळक लक्षण. आपल्या कंपनीच्या प्रेसिडेंटपासून ते ऑफिसबॉयपर्यंत सर्वांना केवळ पहिल्या नावाने हाक मारणे, अरे-तुरे करणे हाच इथला नियम. शिवाय संवाद साधण्याची भाषा प्रामुख्याने इंग्लिश. त्यामुळे मराठी किंवा इतर भाषांसारखं आदरार्थी संबोधन नाहीच मुळी. केवळ you नेच काम होतं. तुम्ही असं म्हणायची गरजच भासत नाही. संवादामधून अशी जवळीक आली की मग तिथूनच कोणताही विषय कोणाशीही मोकळेपणाने बोलण्याचं धाडस आपोआप येतं.
ऑफिसच्या वातावरणातली अनौपचारिकता आणखी वेगळीच. काचेच्या बंद दरवाज्या पलिकडे बसणारी, मोठ-मोठ्या हुद्द्यांवर असल्यामुळे एक प्रकारचं वलय असणारी माणसं इथे अगदी मोजकीच. तुमच्या प्रोजेक्टचा लीड किंवा तुमचा मॅनेजर सुद्धा तुमच्याच शेजारी, तुमच्या सारख्याच क्युबिकल मध्ये बसतो. तेव्हा तो कोणी वेगळा वाटतच नाही.
अजून एक डोळ्यात भरेल असा अनौपचारिकतेचा भाग म्हणजे पेहरावामधला बदल. कॉर्पोरट कल्चरला आय.टी. मुळे नवीन ड्रेस कोड मिळाला. (खरं तर ड्रेस कोड पासून छुटकारा मिळाला) नवीन कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जीन्सवरचा इनफॉर्मल वेअरचा शिक्का जाऊन त्याला बिझनेस कॅज्युअल ची मान्यता मिळाली. त्यामुळेच अंगावर जीन्स, टी-शर्ट, पाठीवर सॅक असा अगदी कॉलेजियन पेहराव या क्षेत्रामध्ये सर्रास दिसतो. वर सांगितल्याप्रमाणे तुलनेने तरुण वयामुळेसुद्धा हा पोशाख पॉप्युलर झाला असावा. कितीतरी जणांचं म्हणणं असं, की रात्री घरी केव्हा परत जायला मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे अगदी रात्रभर ऑफिसमध्ये रहावं लागलं, तरी तितकाच सोयीस्कर होईल असा पोशाख घालणं सर्व जण पसंत करतात.
नर्डस
पाठीवर वाढवलेले केस, त्याचा बांधलेला एक पोनी, वाढलेली दाढी, अंगावर ढगळ असा मळकट -रंगाचा टी-शर्ट आणि खाली तशीच खाकी किंवा मातकट रंगाची शॉर्टस असा अवतार काही वर्षांपूर्वीपर्यंत, कलात्मक समजल्या जाणाऱ्या जाहीरात क्षेत्रामधल्या क्रिएटिव्ह डायरेक्टर्स किंवा आर्ट डायरेक्टर्सची मक्तेदारी होती. पण आय.टी. मधले टिपिकल नर्ड्स सुद्धा या अशा वैचित्र्यामध्ये मागे नाहीत. नर्ड म्हणजे अशी जमात जी केवळ सबस्टन्स वर विश्वास ठेवते. कोणत्याही प्रकारच्या औपचारिकतेला – मग ती हुद्द्यामधून आलेली असेल, कपड्यामधून आलेली असेल किंवा तुमच्या भाषेमधून आलेली असेल – नर्ड्सचा विरोध असतो. ज्या ज्या पद्धतीने किंवा ज्या ज्या प्रसंगामध्ये स्वतःचं मार्केटिंग होईल ते ते सर्व प्रसंग नर्ड्स टाळतात. तर हे नर्ड कल्चर सुद्धा या आय.टी. मध्ये मोठ्या प्रमाणात वाढीस लागतंय.

आभासी स्थलांतर (virtual migration)
यु.एस. ही आय.टी. वाल्यांची पंढरी म्हणतात. त्यामुळे या क्षेत्रामधील करिअरच्या सुरुवातीच्या दोन-चार वर्षांतच कंपनीकडून यु.एस. ट्रीप पदरात पाडून घेणं हे इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचं आद्य ध्येय. अतिशय शॉर्ट नोटीसवर जगाच्या पाठीवर कुठेही जाण्यासाठी तयार असणारी माणसं हे या क्षेत्राचं अजून एक ठळक वैशिष्ट्य. आणि म्हणूनच आज आपल्या कुटुंबातला किमान एक जण तरी परदेशात कुठेतरी स्थायिक झालेला असतोच. हे झालं खरोखरच्या स्थलांतरचं. पण आय.टी.तलं काम म्हणजे आभासी स्थलांतरसुद्धा. स्वतःचं बायलॉजिकल क्ल़ॉक बदलून त्याला यु.एस. किंवा अशा इतर कोणत्यातरी निराळ्याच देशाच्या वेळा पाळण्याची सवय लावणं हे इथल्या लोकांना नवीन नाही.

श्रीमंती
पैशाची श्रीमंती हे तर आय.टी. चं सर्वाधिक चर्चिलं जाणारं आणि सर्वदूर पसरलेलं वैशिष्ट्य. यामध्ये अनेक मुद्दे येतात. तुम्ही काम करत असलेलं डोमेन, तुमच्या कंपनीचा साईज, स्टार्ट-अप्स मध्ये मिळणारे स्टॉक ऑप्शन्स, इतर इन्सेंटिव्ज इत्यादी अनेक.

ही झाली आय.टी.ची अगदी ठळक वैशिष्टय. या सर्वांशी निगडित कितीतरी गोष्टींबद्दल लिहायचा विचार आहे. सर्वांचा सहभाग आणि लिहील्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरचा प्रतिसाद यामधून ही लेखमाला अधिकाधिक रंजक बनत जाईल, अशी आशा आहे.

No comments: