Thursday, April 3, 2008

Column in Saptahik Sakal

गेल्या बुलेटिन बोर्डमध्ये संदर्भ-समृद्धतेबद्दल ओझरतं बोलणं झालं होतं. जागतिकीकरण, सपाटीकरण, आणि संदर्भ-समृद्धतेपासून दूर होत जाणारे आपण...या सगळ्याला आय.टी किती प्रमाणात कारणीभूत आहे? मुळात आपण या समृद्धतेपासून दूर जात आहोत का? जशी-जशी तंत्रज्ञानाची प्रगती होते आणि अनेक वस्तू अनेक लोकांपर्यंत सहजरित्या पोचू लागतात, तशी तशी ही संदर्भ-समृद्धता कमीच होत जाते का? हे अटळ असेल, पण योग्य आहे का?

आपण एखादा नवीन ड्रेस खरेदी करतो. काही दिवसांनी अगदी तसाच ड्रेस दुसऱ्या कोणाच्या तरी अंगावर बघतो आणि मग अचानक आपण खरेदी केलेला ड्रेस आपल्याला नकोसा वाटू लागतो. तो घालू नये असं वाटू लागतं. आपण घालतो तो पोशाख “युनिक” असण्याबाबत आपण इतके सतर्क असू शकतो, तर आपल्या संपूर्ण विचारसरणीतलाच “युनिकनेस” पुसून टाकत जाणारी सपाट जीवनशैली आपण सहजरित्या कशी काय स्वीकारतोय? ज्या फ्लॅट स्क्रीन्स समोर बसून आपण दिवसभर काम करतो, त्या स्क्रीनची सपाटी आपल्यालाही इथून तिथून सपाट करतेय का? असे प्रश्न गेल्या बुलेटिन बोर्डमध्ये समोर आले होते. याच प्रश्नांचा थोडा आणखी खोलवर जाऊन केलेला हा विचार. आय.टी.मध्ये किंवा आय.टी मुळे नेमकं हे का होतंय याची काही कारणं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.

खाली दिलेल्या बदलांपैकी अनेक बदल या सपाटीकरणाला या ना त्या कारणामुळे कारणीभूत झालेले आहेत. यातील अनेक बदल स्वतंत्रपणे बघितले तर चांगलेच आहेत. पण त्यांमुळे वेगवेगळ्या पातळींवर सपाटीकरण झालंय हे मात्र नक्की!

अनौपचारिकता
आय.टी. चं क्षेत्र इथे रुजलं, तशी एकमेकांना केवळ नावाने हाक मारायची पद्धत रुढ झाली. पारंपरिक क्षेत्रांना सरावलेल्या आपल्याला सुरूवातीला आपल्या मॅनेजरला, इतकंच काय आपल्या कंपनीच्या प्रेसिडेंटला देखिल त्याच्या नावाने हाक मारण्याची कल्पना जड गेली. कामाच्या अमेरिकन संस्कृतीचा एक भाग म्हणून रुजवली गेलेली ही पद्धत खरं म्हणजे सपाटीकरणाचा एक अविभाज्य आणि मूलभूत घटक बनून गेली आहे. जगाच्या त्या कोपऱ्यात, वेगळ्याच अक्षांश -रेखांशांवर राहणाऱा कोणी आपला सहकारी. त्याच्याशी बोलताना जेव्हा "Good Morning Mr. Mike" वरुन "hey Mike" अशी भाषा याऊ लागली, तेव्हा आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे नसल्याची भावना निर्माण होणं सहाजिक होतं. समुद्रापलिकडे राहणाऱ्या त्या लोकांबद्दल वाटणारं अप्रूप, वाटणारी भीती या अशा प्रकारच्या अनौपचारिक संवादांमधून हळू हळू गळून पडली. एकेरीमध्ये संवाद होऊ लागल्यामुळे आपण सर्वच जण समान पातळीवर असल्याची भावनी निर्माण झाली. इतकंच नाही तर लातूरचा सोपान, मुंबईचा राहुल, पुण्याची रचना, दिल्लीचा राजीव, मद्रासचा वेंकट, आणि उत्तरांचलचा कैलाश हे सगळेच जण, सारखंच शिक्षण घातलेले, सारखाच पगार घेणारे... एक टीम म्हणून काम करु लागले आणि एक टीम म्हणून या अमेरिकेच्या मॅनेजरशी एकेरीत संवाद साधू लागले. सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवणारी हा फार मोठी आणि वेगळी गोष्ट आय.टी.ने इथल्या वर्क कल्चरमध्ये रुजवली. सपाटीकरणाची सुरूवात इथून झाली.

आजच्या फास्ट-फूड संस्कृती सारखीच आय.टीमधल मॅनेजमेंट सिस्टीम होती. सुरुवातीला नवीन वाटलेली ही व्यवस्थापन पद्धती हळू हळू आपल्याला आवडू लागली. पूर्वीची लोणच्यासारख्या मुरणाऱ्या व्यवस्थापन पद्धतीपेक्षा हा फास्ट संस्कृती जवळची आणि फायद्याची वाटू लागली. एक सामान्य वर्कर आणि त्याचा सुपरवायझर यांच्या मध्ये असणाऱ्या अनेक हुद्द्यांच्या पायऱ्या या नवीन व्यवस्थापनामध्ये गळून पडल्या आणि एक प्रकारची सपाट व्यवस्थापन रचना निर्माण झाली. या रचनेमध्ये अगदी नुकताच जॉईन झालेला सॉफ्टवेअर इंजिनियर देखिल थेट प्रेसि़डेंट कडे केव्हाही जाऊ शकत होता. बंद दरवाच्या आत बसणारे मॅनेजर्स, त्यांच्या केबिन बाहेर थांबलेले शिपाई हे चित्र साफ पुसलं गेलं. कितीही मोठ्या हुद्दयावर असलात तरी तुम्ही सर्वांना अप्रोचेबल असायला हवं ही pre-condition असल्यामुळे सगळी hierarchy नष्ट झाली.

कोडींग = मर्यादित पर्याय = बायनरी
आय.टी.म्हणजे बायनरी. आय.टी.ला समजते ती भाषा फक्त 0 आणि 1 ची. या भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचं उत्तर हो किंवा नाही. खरं किंवा खोटं. बरोबर किंवा चूक इतकंच असू शकतं. याच्या मधली दुसरी कोणतीच शक्यता इथे असू शकत नाही. आपल्या प्रत्यक्ष जगण्यामध्ये मात्र, हो-नाही, खरं-खोटं, बरोबर-चूक, यांच्या सीमारेषेवर असणारंच बरंच असतं. किंबहुना सगळंच या सीमारेषेवर असतं.

आय.टी.मध्ये मात्र तसं नाही. उदाहरणच घेऊयात. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तयार केलेली फाईल सेव्ह करायची असेल, तर तुम्ही कीबोर्ड वापरु शकता किंवा माऊस वापरु शकता. या दोन्हीपैकी एका कोणत्यातयरी पर्यायची व्हॅल्यू 1 म्हणजे True असायलाच हवी. तिसरा पर्यायच इथे नाही. आणि या प्रि-प्रोग्रम्ड पर्यायांपैकी कोणती पर्याय निवडला नाही, तर तुम्हाला मिळेच ती मोठ्ठी ERROR. हे एक प्रकारचं सपाटीकरणच आहे. सर्वांसाठी सारखेच आणि मर्यादित पर्याय. असं असतं तेव्हा निवडीचं फारसं स्वातंत्र्य रहात नाही हे खरं असलं तरी, मर्यादित पर्यायांपैकी एकाची निवड केली, का कामही होतंय असं दिसतं. त्यामुळे मग निवड स्वातंत्र्य नसल्याची खंतही कमी होते.

आता विचार करा. दिवसातले जवळ जवळ 12 पैक्षा जास्त तास अशाच बायनरी विचारात घालवल्यावर या मर्यादित पर्यायांची सवय लागणार नाही तर काय? म्हणूनच कदाचित एखादी गोष्ट खरेदी करायची असो किंवा निवडणुकीमध्ये मतदान करायचं असो, विचार बायनरीच होतो.
प्रवाहाबरोबर जाणं. प्रवाह जाईल तिकडे जाणं आणि आय.टी. बूमच्या या काळात तर प्रवाह आपल्याला संपन्नतेकडेच नेतो आहे, याची खात्री असल्यामुळे प्रवाहाबरोबर खुशीत जाता येतंय.

पॅसिव्ह शिक्षण
हल्ली कोणाला वाचायला काय आवडतं असं विचारलं, तर जास्तीत जास्त लोकांचा कल सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकांकडे असतो. यामध्ये सपाटीकरण आलंय. 7 habits of highly effective people, 12 ways to lead healthy and successful life, 10 steps towards mental satisfaction, 85 tips to loose weight.. असंच काहीतरी. म्हणजे सगळं आकड्यंच्या किंवा स्टेप्स त्या भाषेत हवं. याचा संबंध सुद्धा आय.टी.मधल्या एका विशिष्ट प्रकारच्या कार्यपद्धतीशी लावता येऊ शकेल.
आय.टी मध्ये, करता येण्या जोग्या प्रत्येक गोष्टीची एक “प्रोसेस” बनवून टाकलेली आहे. एका विशिष्ट पद्धतीनेच प्रश्नांची उत्तरं शोधली गेली पाहिजेत. एका विशिष्ट पद्धतीने किंवा क्रमानेच एखादी गोष्ट केली गेली पाहिजे. हा आग्रह. कारण एकच, कोणीही ती गोष्ट केली, त्याच क्रमाने केली आणि काही कारणाने ती गोष्ट अयशस्वी झाली, तर नेमक्या कोणत्या स्टेप मध्ये गोची आहे, हे पटकन लक्षात यावं.
प्रसिव्ह मनोरंजन किंवा पॅसिव्ह शिक्षणाची लागलेली सवय थोडी-फार अशीच नाही का?

आय.टी. आणि सपाटीकरणाशी संबंधित अशा अजून अनेक गोष्टी पुढच्या लेखामध्ये!

Column in Saptahik Sakal

जग जवळ येणं म्हणजे नक्की काय हे आपल्याला खऱ्या अर्थानी समजलं आय.टी.चं हे क्षेत्र अगदी आपल्या घरापर्यंत योऊन ठेपल्यापासूनच. आपल्या घरातली एखादी जवळची
व्यक्ती परदेशी गेल्यामुळे,तिच्याशी संपर्क ठेवण्यासाठी अपरिहार्यपणे इंटरनेट शिकून घ्यायची वेळ आई-वडिलांवर आली आणि संगणकाच्या पडद्यापलिकडचं कितीतरी मोठं जग
संपूर्ण कुटुंबासाठीच खुलं झालं.

आपल्या घरातल्या एखाद्या वयस्कर आजी किंवा पणजीला, परदेशात असलेल्या तिच्या नातवाच्या किंवा पणतुच्या सगळ्या बाललीला जेव्हा संगणकावर प्रत्यक्ष बघायला
मिळतात,तेव्हा अहो आश्चर्यम चा भाव तिच्या चेहऱ्यावरुन काही केल्या लपत नाही. याच्या अगदी विरुद्ध,त्याच घरातल्या साधारण दहा वर्षांच्या मुलाला सुद्धा विकीमॅपियावर जाऊन त्याच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये असलेलं अफ्रिकेमधलं एखादं ठिकाण लोकेट करणं आणि तिथल्या भौगोलिक रचनेचा एरियल व्ह्यू घेणं यात काहीच आश्चर्य वाटत नाही. त्याच्या दृष्टीने ही गोष्ट घरामध्ये टि.व्ही. किंवा फ्रीज असण्याचइतकीच स्वाभाविक असते.

कॅनडामध्येच जन्म झालेला, शिक्षण ही तिथेच घेणारा 9 वर्षांचा माझा भाचा जेव्हा पुण्यामध्ये येतो, तेव्हा पुण्यामध्येच जन्म झालेला आणि पुण्यामध्येच शिक्षण घेणारा माझा 9 वर्षाचा अजून एक भाचा त्याच्याशी सहज संवाद साधू शकतो. त्याच्या करिता कॅनडाचं अप्रूप आजिबातच नसतं. ते दोघेही सारख्याच माहितीच्या आधारे फॉर्म्युला वन रेस बद्दल, हॅरि पॉटरबद्दल, अमेरिकन आयडॉलबद्दल, किंवा फुटबॉलबद्दल सहजरित्या बोलू शकतात.

काय म्हणणार आपण या प्रक्रियेला? सपाटीकरण? सपाटीकरण - flattening- हा शब्द अलिकडच्या काळात बर्याचवेळा वापरला गेला, थॉमस फ्रीडमन चं world is flat प्रसिद्ध झाल्यापासून. पण वर सांगितलेली उदाहरणं बहुधा या सपाटीकरणाच्या पलिकडे जाणारी आहेत. इथून-तिथून सगळं सारखंच असणं ही प्रगती म्हणायची की दुसरं काही? आपण आपल्या घरात बोलतो ते विषय आणि जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एखाद्या कुटुंबात बोलले जाणारे विषय हे सारखेच आहेत. मनोरंजन, फॅशन, सौदर्यबुद्धी, खेळ, तंत्रज्ञान या सर्व बाबतीत या कुटुंबाचे असणारे प्रेफरन्सेस सुद्धा सारखेच आहेत. हे का आहे? हे कसं झालं? हे चांगलं आहे का?

सध्याच्या जगाचा विचार केला, तर ज्या प्रगत किंवा विकसनशील देशांबद्दल आपण बोलतोय, ते देश हे राजकीय स्वातंत्र्य केव्हाच मिळवून बसलेत. त्या देशांमध्ये असणारा,
वेल-टू-डू असा मोठा वर्ग स्वतःची विचारधारा सहजपणे संगणक नावाच्या साधनाकडे देऊन मोकळा झालेला दिसतो. ही गुलामगिरी नाही. ही स्वखुशीने स्वीकारलेली बांधिलकी
आहे. त्यामुळेच जगभर दररोज येणाऱ्या विविध प्रकारच्या अपडेटेड माहितीने स्वतःचा संगणक कामात ठेवण्याच्या मागे सर्व जण लागलेले आहेत. जगामध्ये येणारी लेटेस्ट
ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या संगणकावर आणण्याच्या मागे लागलेले आहेत. मग जगातल्या विचार करण्याची क्षमता असणाऱ्या प्रत्येक घरामध्ये अशी एकच एक सारखीच
ऑपरेटिंग सिस्टीम असेल, तर बोलण्याचे विषय, खाण्याच्या सवयी, वागण्याचे मॅनर्स, लिहीण्याची भाषा यामध्ये विविधता येणार कशी?

अशा अनेक गोष्टींमध्ये एका व्यक्तीचं आणि त्या अनुषंगाने एका समाजाचं म्हणून असणारं वेगळेपण या सगळ्यामुळे हरवलंय.

अगदी माहितीतली, जवळची उदाहरणं घेऊयात. आपलं हस्ताक्षर किंवा आपली स्वाक्षरी ही अगदी आपली स्वतःची अशी ओळख असते. आपलं अक्षर हे फक्त आपलं असतं.
दुसरी व्यक्ती कितीही प्रयत्न केली तरी तंतोतंत आपल्यासारखं हस्ताक्षर काढू शकत नाही. आता, आय.टी.मध्ये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जाऊन विचारा, की हातामध्ये पेन घेऊन कागदावर, स्वतःच्या अक्षरात लिहून त्यांना किती वर्ष झाली? आज मला स्वतःला सुद्धा स्वतःचं अक्षर ओळखता येत नाही. कारण माझं अक्षर मला फक्त Arial, Tahoma, Times New Roman मध्येच बघायची सवय झाली आहे. आणि मग Arial, Tahoma, Times New Roman तर जगातल्या कोणाही व्यक्तीकडे असतात. सपाटीकरणाची ही अगद अगदी मूलभूत अशी सुरूवातच नाही का?

अक्षरानंतर येते, ती भाषा आणि भाषेमधून तुम्ही मांडता ते विचार. आजकाल सगळंच cool असतं. आपल्या भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं तर सोडाच पण जगाच्या भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं म्हटलं तरी
Controlled language वापरावी लागते. आय.टी.क्षेत्रामध्ये मी टेक्निकल रायटर म्हणून काम करते. लिखाणाची आवड या एका प्रेरणेने या क्षेत्रामध्ये गेले, तेव्हा मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं, की आपल्याकडे असलेली शब्दसमृद्धी हा, टेक्निकल रायटर म्हणून काम करताना गुण म्हणून गणला जाणार नाही. पण असंच होतं.
एखादी गोष्ट युझर ला समजावून सांगताना निरनिराळे शब्द वापरणं हे कसं अयोग्य आहे, हेच मला शिकवलं गेलं. आणि याचं कारणं असं, की ज्या एका सॉफ्टवेअर बद्दल मी
लिहीते आहे, त्याच्या इतर काही पैलूंबद्दल इतर अनेक लेखक लिहीत आमच्या वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये लिहीत असतील. त्या प्रत्येकाने आपापल्या शब्दबळानुसार एकाच
गोष्टीचं वर्णन करायला निरनिराळे शब्द वापरले, तर त्या लिखाणाचं भाषांतर करताना मशीन गोंधळून जाईल. (हो, बरोबर! मशीनच म्हणते आहे मी. कारण आमच्याकडे पहिलं भाषांतर मशीन करतं आणि मग ते बरोबर आहे की नाही, हे एखादा भाषातज्ज्ञ तपासतो.) तर, त्या मशीनचा गोंधळ होऊ नये, म्हणून आम्ही केवळ आमच्या डिक्शनरी मध्ये दिलेलेच शब्द वापरुन जे लिहायचं ते लिहीतो. आहे की नाही गम्मत.सपाटीकरणाचा अजून एक पैलू!

फोनवर बोलण्याच्या पद्धती, एकमेकांशी इ-मेल मधून संवाद साधण्याच्या पद्धती, एकमेकांशी फोनवर बोलण्याच्या पद्धती सगळं सगळं सपाट करण्याच्या मागे जो तो लागला आहे. माझ्या मॅनेजरने माझ्य़ा चांगल्या कामाचं कौतुक करण्यासाठी "keep up the good work!" अशीच्या अशीच फ्रेज वापरली पाहिजे.मग तो मॅनेजर भारतात बसणारा असो किंवा अमेरिकेत. एखादं काम नीट होत नसेल, तर त्याचं वर्णन करताना जगाच्या कोणत्याची कोपऱ्यातल्या आय.टी. व्यावसायिकाने "we need put a process in place" असे शब्दप्रयोग खरायला हवेत. आपण किती बिझी आहोत, हे दाखवत दाखवत कोणत्याही मीटिंगला जाताना एखादा मॅनेजर "I need to do a hardclose at 4.30" असं म्हणाला नाही तरच नवल. "work sucks!", "it has to be done asap", what is the eta (expected time of arrival) for this?", "i am on pto (personal time off)" हे सगळं असंच्या असंच सगळीकडे बोललं जातंय... सपाटीकरणाचा एक भाग म्हणून!



टाईम झोन्स, भौगोलिक मर्यादा, सांस्कृतिक भिन्नता, आर्थिक स्तरांमधला भेद या सगळ्याच्या पलिकडे जाऊन ही सपाटीकरणाची प्रक्रिया वेग घेते आहे. आता हे वेग अंगावर येऊ लागला आहे. टेक्नॉलॉजी, ट्रेड, ट्रॅव्हल, आणि टेलिव्हिजन...आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या या चार "T"मुळे वेग घेणारी ही प्रक्रिया. एडवर्ड
हॉल नावाच्या एका मानववंशशास्त्रज्ञाने सर्वप्रथम "संदर्भ-समृद्धता" या विषयावर त्याच्या "The Silent Language and The Hidden Dimension" या पुस्तकामध्ये लिहीलं आहे. त्याच्या मते, कोणताही समाज हा "उच्च संदर्भ-समृद्ध" किंवा "नीच संदर्भ-समृद्ध" असू शकतो. ही संदर्भ समृद्धता येते
वेगळेपणामधून. अशा समृद्ध समाजामध्ये, भाषेमधून व्यक्त होणारा अर्थ हा केवळ उच्चारांमधून आलेला नसतो. त्याला बराच मोठा संदर्भ असतो आणि तो संदर्भ समजल्याखेरीज ती भाषा किंवा तो शब्दही समजून घेणं शक्य नसतं. एडवर्डच्या या संकल्पनेच्या आधारे म्हणायचं, तर भारतीय समाज हा संदर्भ-समृद्ध होता.सपाटीकरणाच्या या प्रक्रियेमुळे आपण या संदर्भ-समृद्धतेपासून दूर तर जात नाही? थोडासा अजून विचार करुयात, पुढच्या बुलेटिन बोर्ड मध्ये.

आय.टी तला ग्राहक – चोखंदळ की शौकीन?- Column in Saptahik Sakal

सध्याच्या काळात, वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये असणाऱ्या ग्राहकवर्गाचा मिळून एक डार्ट बोर्ड बनवला, तर त्याच्या बरोब्बर मध्यभागी आय.टी.तले लोक दिसतील. घरापासून ते गव्हापर्यंत अनेक वेगवेगळ्या वस्तू विकणाऱ्या सर्वं विक्रेत्यांचं लक्ष्य – target – तो मधला बिंदू असतो. एका जाहीरात संस्थेमध्ये कॉपी रायटर म्हणून काम करणारा माझा मित्र, नवनवीन घरांच्या स्कीम्सच्या किंवा नवनवीन सेल फोन्ससाठी मिळणाऱ्या ऑफर्स च्या जाहीराती कायम मला वाचायला देतो आणि विचारतो, “ ही जाहीरात वाचून तू हे विकत घेशील का?”

हातामध्ये असलेली कमालीची क्रयशक्ती, नव्याची आवड, प्रत्येक गोष्टीमध्ये जागतिक दर्जाचा आग्रह या सगळ्यामुळे आय.टी.हे सध्याचं टार्गेट झालं आहे. सतत परदेशी वाऱ्या करणाऱ्यांची संख्या जशी वाढत गेली, तशी तशी जागतिक दर्जाची गरज सुद्धा वाढत गेली. कोणत्याही गोष्टीमध्ये वर्ल्ड क्लास अमेनिटिज असा शब्द वापरला, तरच या लोकांना किमान दर्जाची खात्री पटते असं विक्रेत्यांना वाटत असावं. म्हणूनच रो हाऊसेस, रेफ्रिजरेटर, जीन्स चा नवा ब्रॅंड, टेपेस्ट्री, कारचा डॅशबोर्ड, कमोड, ज्वेलरी, हातरुमाल, चप्पल, चष्मा हे सगळंच्या सगळं हल्ली वर्ल्ड क्लास झालं आहे. J J J

जागतिकीकरण - globalization - आणि कन्झ्यमुरिझम या दोन्ही संकल्पना आता हातात हात घालून पुढे जातात. म्हणूनच आय.टी.मध्ये काम करणारी व्यक्ती जेव्हा ग्राहक म्हणून मार्केटमध्ये बाहेर पडते, तेव्हा ती कशी वागते यावरची ही काही निरीक्षणं.

प्रवेशाची पातळी उंचावते
वस्तुच्या किंमतीचा विचार करुन खरेदी करणाऱ्यांच्या फळीमध्ये आय.टी.तला ग्राहक बसत नाही, तर तो दर्जाबद्दल अधिक आग्रही असतो. शिवाय या ग्राहकवर्गाचं सरासरी वय सुद्धा अगदीच तरुण असतं. त्यामुळे पूर्वीसारखं हे तरुण ग्राहक अनेक हाय-एंड वस्तुंचे First Buyers असले, तरी First Experiencer असतात असं नाही. खरेदी करण्यापूर्वीच या ग्राहकाने त्या वस्तुचा ग्राहक बनण्याचा अनुभव घेतलेला असतो. शिवाय अनेक वस्तुंच्या किंमती पाहताना हा ग्राहक तिची एकरकमी किंमत न पाहता, तिचा EMI - मासिक हफ्ता - बघतो. म्हणूनच कदाचित आता मारुती 800 ला Entry-Level Car म्हणता येत नाही, तर बऱ्याचवेळा Ford Icon सुद्धा Entry-Level Car बनून जाते.

अपग्रेडेड जीवनशैलीचा आग्रह
एकदा घेतलेला शर्ट 15 वर्ष वापरणार्या पालकांची ही आय.टी मधली मुलं. व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी स्वतःचं ज्ञान सतत अपग्रेड करत राहण्याची यांची सवय यांच्यातल्या ग्राहकाला सुद्धा लागली आहे. टि.व्ही. असो, मोबाईल फोन असो, कार असो, किंवा अगदी स्वतःचं राहतं घर असो. काही वर्षांनतर ते OUTDATED होतं आणि ते अपग्रेड करायची गरज भासू लागते.
काही मित्रांशी याबद्दल बोलले, तेव्हा असं लक्षात आलं की आजकाल,
मोबाईल 12 महिन्यांमध्ये अपग्रेड होतो.
टिव्ही 3 वर्षांमध्ये अपग्रेड होतो.
कार पाच वर्षांच्या आत अपग्रेड होते.

एक कुटंब; एक गरज; अनेक वस्तू
जागतिकीकरण, क्न्झ्युमरिझम या सगळ्यांमुळे आणि इतरही अनेक कारणामुळे आय.टी तल्या माणसांना व्यक्तिवाद शिकवला. Individualism मुळे प्रत्येक माणसाची गरज एकच असली, तरी ती गरज भागवण्याचे प्रत्येकाचे पर्याय वेगवेगळे असू शकतात आणि आपले पर्याय आपल्या अगदी जवळच्या कुटुंबियांवरसुद्धा लादणं योग्य नाही, हेही शिकवलं. त्यामुळेच टि.व्हीवर एकाच कुटुंबातल्या माणसांना, एकाच वेळी वेगवेगळे कार्यक्रम बघता यावेत म्हणून प्रत्येकाच्या बेडरुम मध्ये टि.व्ही सेट आला. दोन कार्स असणं ही गरज बनली.

आय.टी तल्या ग्राहकांची ही बदलती आवड मार्केट ने टिपली नसती तरच नवल. या लोकांना सतत नवीन माहिती देत राहणं गरजेचं असल्याचं ओळखून प्रत्येक क्षेत्रातले विक्रेते आपापल्या परीने या ग्राहकांना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात.
--------------------------------------------------------------------------------
बॅंकिंग
आता मी सांगते आहे तो किस्सा कोणत्याही आय.टी. तल्या व्यक्तीला नवीन नाही.

तुम्ही कुठेही असता, मीटिंगमध्ये, डेस्कवर, चॅटवर, कारमध्ये, पॅन्ट्रीमध्ये, टॉयलेटमध्ये आणि तुमचा सेलफेन वाजतो. दुसऱ्या बाजुनं कॉल सेंटर मधला अगदी सराईत आवाज येतो,

“Good afternoon maa’m / Sir… I am calling from XYZ Bank… Are you holding XYZ Bank Credit Card?”

या प्रश्नावर तुमचं उत्तर नकारार्थी असेल तर तातडीनं खालील वाक्य येतं...

“Our bank is offering you a life time free credit card. You will get a credit limit of X lakhs and a cash withdrawal facility of Y thousand… and blah blah blah blah…”

पहिल्या प्रश्नावर तुमचं उत्तर होकारार्थी असेल आणि तुमच्या जवळ आधीच त्या बॅंकेचं क्रेडिट कार्ड असेल, तर तातडीनं खालील प्रश्न येतो...

“Do you need a personal loan maa’m / Sir? We have a pre-sanctioned loan of Z lakhs for you?”

तुम्हाला यातलं काहीच नको असतं. आधीच काढून ठेवलेल्या होम लोन, कार लोन, आणि आधीच असलेल्या क्रेडिट कार्ड वरच्या ड्यूजमुळे तुम्हr वैतागलेले असता आणि म्हणून तुम्ही त्यांना विचारता,

“Where did you get my number from?”

उत्तर येतं,

“It is in our database, maa’m / sir?”

तर असं हे चित्र. जिथे जिथे मोठ्या खर्चाची तयारी लागते, त्या सर्व डेटाबेसेस मध्ये कुठून ते माहीत नाही, पण आय.टी.तल्या सर्व व्यक्तींचे नंबर्स असतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------
फूड
2006 च्या आकडेवारीवर आधारित प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये एक फार गमतीशीर पहाणी झाली. RNCOS या सुप्रसिद्ध मार्केट रिसर्च मध्ये काम करणाऱ्या संस्थेने भारतातील फूड इंडस्ट्रीवर एक सर्वेक्षण करुन त्याचा एक वृत्तान्त नुकताच प्रसिदध केला. त्यानुसार, “भारतीय शहरांमध्ये आय.टी.मुळे झालेल्या बदलांमुळे प्रोसेस्ड फूडची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वेक्षणानुसार शहरामधील नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येमध्ये झालेली वाढ आणि त्यांच्या कामाच्या वेळामध्ये झालेली वाढ यामुळे प्रोसेस्ड फूडची मागणी वाढली आहे.” म्हणजेच आता फूड इंडस्ट्रीसाठी पण आय.टी.हे टारगेट बनलं आहे. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये शहरांमधून दिसणारे स्पेन्सर्स, स्पाईस लाईफ, मोअर, रिलायन्स फ्रेश सारखे शॉपिंग मॉल्सदेखिल मुख्यतः याच वर्गाला टारगेट करताना दिसतात. निवडलेल्या चिरलेल्या भाज्या, रेडी टू कूक फू़ड आयटम्स हे केवळ महिलांच्या सोयीसाठी नाहीत. शहरांमध्ये नोकरीसाठी येऊन एकटा राहणारा तरुण वर्गसुद्धा मोठा आहे. मंडईमध्ये जाऊन भाजी घेण्यात त्यांना रस नाही. त्यांच्याकडे वीकएंड मोकळा असतो. मग त्यांची ही गरजसुद्धा भागेल आणि वीकएंड हॅंगआऊट्सच्या त्यांच्या यादीमध्ये शोभेल अशा प्रकारच्या या मॉल्सची उभारणी झाली.


रिअल इस्टेट

काही वर्षांपूर्वीपर्यंत कर्ज काढणं ही काही फारशी चांगली बाब समजली जात नव्हती. सावकाराच्या व्याजाबद्दलच्या मोठ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींचा हा परिणाम असावा. पण गेल्या काही वर्षांमध्ये ही परिस्थितीसुद्धा एकदम बदलून गेली. इन्कम टॅक्समध्ये मिळत असलेल्या फायद्यामुळे म्हणा, इतर कोही सोयींमुळे म्हणा, किंवा सहज उपलब्धतेमुळे गृहकर्ज काढणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. होम लोनच्या या वाढलेल्या लोकप्रियतेचं कारणसुद्धा निरनिराळ्या बिल्डर्सने आय.टीतील लोकांची गरज आणि आवड ओळखून आखलेल्या गृहयोजना आणि निरनिराळ्या बॅंकांनी आय.टी.मधील लोकांसाठी काढलेल्या आकर्षक गृहकर्ज योजना हेच आहे. इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल सारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना गृहकर्जाच्या व्याजदरामध्ये मिळणाऱ्या विविध सवलती म्हणजे सुद्धा आय.टी. चं मार्केट टॅप करणंच तर आहे.

तर असा हा आय.टीतला ग्राहक राजा... शौकीन!

50 k? नॉट ओके !- Column in Saptahik Sakal

हो. कमावतो आम्ही पन्नास हजार रुपये महिन्याला. माहिती आहे आम्हाला की काही जणांचा वर्षभराचा पगार असतो एवढा. पण याचा अर्थ असा मुळीच नाही, की आम्हाला प्रश्नच नाहीत. आमचे काही इश्यूज नाहीत.

उदाहरणं देतो चला !

परवा लंच साठी पॅन्ट्रीत गेलो. जेवण झाल्यावर हात पुसावे म्हटलं तर टेबलवर टिश्यू पेपर्सच ठेवलेले नाहीत. होतं कधीतरी. म्हटलं संपले असतील. म्हणून उठून वॉशरुममध्ये जाऊन हात धुतले... तर तिकडेसुद्धा हात पुसायला टिश्यू पेपर्स नाहीत. आता तिथे हॅन्ड ड्रायर होता म्हणून ठीक आहे. पण नसता तर ? आणि असं 1-2 दिवस नाही.. चक्क आठवडाभर सुरू हो ! मग विचार केला की आता मात्र काहीतरी केलंच पाहिजे. लिहीली एक मेल सर्वांना...

“Dear Colleagues,

टिश्यू पेपर्स शिवाय जगाची कल्पना केली आहे का कधी ? जग सोडा. पण टिश्यू पेपर्सशिवाय ऑफिसची कल्पना केली आहे का ? आम्हाला माहिती आहे, की आपल्या ऑफिसमधले सर्व जण गेला आठवडाभर या त्रासाचा अनुभव घेत आहेत. आपल्या एडमिन (प्रशासन) ला याचे काहीच कसे वाटत नाही ?

म्हणूनच आपण सर्वांनी पुढचा सोमवार हा बहिष्कार दिवस” म्हणून पाळायचा आहे. तर आपला एक्शन प्लॅन असा-

दिवस- सोमवार
स्थळ- ऑफिस
योजना- सर्वांनी ऑफिसला येताना आपला शर्ट, कुरता, टी-शर्ट ला सेफ्टी पिन ने रुमाल लावून यायचं. एडमिन जोपर्यंत आपल्याला टिश्यू पेपर्स देत नाही, तोपर्यंत असं रोज करायचं.

या विषयावर अजून काही मतं असल्यास जरुर सांगा. याच प्रकारचे, work environment (कामाचे वातावरण) शी निगडित अजूनही काही genuine प्रश्न असल्यास तेही आम्हाला जरुर कळवा.

Thanks
---आयोजक”

या मेलला सर्वच जणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अहो मिळणार नाही तर काय. प्रश्नच तसा genuine होता ना. इतकंच नाही तर लोकांनी असे अजून कितीतरी प्रश्न समोर आणले.


त्यातले काही प्रतिनिधिक प्रश्न खालील प्रमाणे---

ऑफिसमध्ये असलेल्या जिममधील ए.सी. चे टेम्परेचर 22 च्या खाली येत नाही.
गेला महिनाभर 9 व्या मजल्यावर असलेल्या व्हेंडिंग मशीन मधून लेमन टी येत नाही. त्यामुळे आम्हाला सातव्या मजल्यावरुन लेमन टी आणावा लागतो. परिणामी आमच्या कामाचा बराच वेळ जातो.
गाणी ऐकण्यासाठी ऑफिसकडून देण्यात येणार्या हेडफोन्सचा दर्जा चांगला नाही.
आमचा अटायर आलवन्स वाढवून मिळावा. सध्याच्या अलावन्स मध्ये दर महिन्याला साजर्या होणार्या विविध डेजची गरज भागत नाही. (उदाः पिंक डे, व्लॅक-व्हाईट डे, इत्यादी.)
कॉमन पॅन्ट्रीमध्ये असणारे पूल चे टेबल एका बाजूने कलले आहे. कृपया ते लवकरात लवकर दुरूस्त करुन घ्यावे.
ऑर्कुट सारखी कंपनीने बॅन केलेली पोर्टल्स, किंवा याहू, गुगल टॉक सारख्या बॅन केलेल्या मेसेंजर्सचे प्रोक्सी कळवण्याची सोय करावी.

हे आणि असे कितीतरी प्रश्न समोर आले. आता तुम्हीच सांगा... हे प्रश्न काय प्रश्न नाहीत ?



हा सगळा दिखाऊपणा, नखरेलपणा वाटतोय ना ? हे सगळं धक्कादायक किंवा धोकादायक वाटतंय ना ? पण हे असंच आहे. आई-वडिलांना रिटायरमेंटच्या वेळेस सुद्धा मिळत नव्हता, एवढा पगार पहिल्याच नोकरीमध्ये आम्हाला मिळतो. कधी कधी विचार करताना असं वाटतं की हा खरंच इझी मनी आहे का ? याचं समर्थन कसं बरं करायचं ? असे काही प्रश्न मनात घेऊन समव्यवसायी काही मित्रांशी चर्चा केल्यावर काही मुद्दे जाणवले. ते सांगवेसे वाटताहेत.

इथे काम करणाऱ्या अनेक जणांच्या मते, आपण गुंतवत असलेला बेसुमार वेळ, आणि त्या जोडीला येणारे अनेक प्रकारचे आरोग्याशी निगडित असणारे प्रश्न... .याची किंमत म्हणून तो गलेलठ्ठ पगार असतो. दुसरं म्हणजे. It is all about business. शेवटी प्रत्येक काळामध्ये असा एखादा व्यवसाय एकदम चलतीमध्ये येतच असतो. तसा या काळामध्ये सॉफ्टवेअरचा व्यवसाय आहे. उद्या तो असेलंच असं सांगता येत नाही. कायमची अशाश्वती हे सुद्धा या इंडस्टीचं एक महत्वाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे, या अशाश्वतीची सुद्धा ही किंमत असते. या इंडस्ट्रीची सगळीच व्यवस्था डॉलर इकॉनॉमी आहे. त्यामुळे अर्थातच सगळी गणितं डॉलरच्या पटीत वाढतात. अशा सर्व कारणांमुळे बाहेरुन लोकांना फक्त या मध्ये मिळणारा पगराचा मोठा आकडाच दिसतो. कितीतरी लोकांना तर सॉफ्टवेअर मध्ये काम करणारे लोक आणि इतर व्यवसायांमध्ये असणारे लोक यांच्यामधला फरक अगदी साक्षर - निरक्षर मधल्या फरकासारखा वाटतो. त्यामुळेच सॉफ्टवेअर जीवनशैली ही आपल्याला न परवडणारी जीवनशैली असा समज होत चालला आहे.

“तुमचं काय बुवा”... असं वाक्य या इंडस्ट्रीमधल्या लोकांना नवीन नाही.
एका मैत्रिणीने सांगितलेला तिचा अनुभव तर अगदीच बोलका होता. तो तिच्याच शब्दात असाः

---------------------------------------------------------------------
मला सॉफ्टवेअरमध्ये कामाला लागून आता 5 वर्ष झाली. या 5 वर्षांमध्ये मी साधारण 4 वेळा अमेरिका, जर्मनी, इंग्लंड अशी फिरुन आले. नेहमीच परत येताना मी माझ्या नातेवाईकांसाठी काही ना काही आणत होते. यावर्षी दिवाळीमध्ये मी गावी गेले, तेव्हा माझ्या आजीसाठी माझ्या चुलत भावाने छान स्वेटर आणला होता. स्वेटर बघून माझी आजी... जिने वयाची सत्तर वर्ष इथे काढली आहेत... ती काय म्हणाली असेल?

“मला हा असला नेपाळ्याकडचा स्वेटर देत नको जाऊ बाबा. त्याची लोकर भारी टोचते अंगाला आणि त्याची घडी पण नीट होत नाही. मला आपला नेहा पाठवते तो अमेरिकेकडचाच स्वेटर बरा वाटतो. छोटी घडी होते आणि ऊबदार आणि मऊसुद्धा आहे.”
---------------------------------------------------------------------


संपूर्ण आयुष्य इथे काढलेल्या, अमेरिकेचं कधी तोंड देखिल न बघितलेल्या या आजीबाईंची जीवनशैली आणि त्यांच्या अपेक्षा जर त्यांच्या सॉफ्टवेअर मधल्या नातीमुळे इतक्या उंचावत असतील, तर स्वतः त्या नातीची जीवशैली तशीच मध्यमवर्गीय राहावी अशी अपेक्षा करता येईल?

पण बर्याच जणांच्या मते जीवनशैलीमधल्या या बदलाचा अर्थ कुटुंबातल्या कितीतरी जणांना लावताच येत नाही.

साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंत मध्यमवर्गीय घरांमध्ये मुलांना शिक्षण दिलं, की त्यांनी लवकरात लवकर बऱ्यापैकी कमवायला लागावं आणि आई-वडिलांना म्हातारपणी आधार द्यावा इतपत अपेक्षा मुलांकडून असायची. रिटायरमेंटनंतर फंड आणि ग्रॅच्युटी च्या रकमेला मुलींचे लग्न, नवीन घर, किंवा जुन्या घराचे नूतनीकरण अशा वाटा असायच्या.

याच्या बरोबर विरुद्ध... कामाला लागून 4-5 वर्ष होत नाहीत तोवर आमचे, आमच्या मित्र-मैत्रिणीचे फ्लॅट्स, कार, हे सगळं झालेलं असतं. हे सगळं एकदा झालं, की मग त्याच्या जोडीला येणारी जीवनशैली मेंटेन करण्याचा खेळ सुरू होतो. एसी कारमध्ये बसून ऑफिसला जायचं, एसी ऑफिसमध्ये बसायचं, दुपारी लंचसाठी एसी हॉटेलमध्ये जेवायला जायचं, मॉल्समध्ये शॉपिंग करायचं, वीकएंडसाठी सुद्धा असंच एखादं अप-मार्केट ठिकाण गाठायचं आणि मग ऑफिसमध्ये टिश्यू पेपर्स नसण्यासारखी पॉमेरियन दुःख कुरवाळायची.

आम्ही जितके जास्त पैसे कमावतो, तितकी जास्त बचत होते का ? वरवर बघताना असं वाटतं, की चला पूर्वी मी महिन्याला केवळ दहा हजार कमवत होते आणि तरीही 4 हजार वाचवू शकत होते. म्हणजे त्याच प्रमाणात आता मी महिन्याला पन्नास हजार कमावले, तर 20 हजार वाचवू शकेन. पण असं तर होत नाही ना. वर सांगितलेल्या उदाहरणामधल्या आजीबाईंप्रमाणे अनेक सोयी केव्हा आपल्या गरजा होऊन बसतात, कळतच नाही. आणि मग फिनिश लाईनच्या जवळ जातोय असं वाटेपर्यंतच पुन्हा एकदा ती लांब जाते आणि पुन्हा एकदा आम्ही धावायला सज्ज होतो. माहीती असतं, की हे धावणं काही खरं नाही आण कुठवर धावणार आपण. आपला दम संपला की थांबावं लागणार. म्हणून मग आम्ही असं ठरवतो, की आत्ता आपलं वय आहे आणि दमसास आहे तोवरच धावून घ्यावं. जितना बटोर सकते हो, बटोर लो!

चाळीशीला रिटायर होण्याची स्वप्नं बघणारे आम्ही म्हणूनच म्हणतो, 50 k is not ok!

सर सलामत तो पगडी पचास - Column in Saptahik Sakal

खरं म्हणजे आय.टी. आणि फिटनेस वरच्या लेखाचा प्लॅन लगेचंच नव्हता. पण डिसेंबरपासून आय.टी. मध्ये अनेक प्रकारच्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स सुरु झाल्या आणि हा विषय एकदम चर्चेत आला. त्यामुळे म्हटलं, थोडासा फ्लो ब्रेक करुन फिटनेस बद्दल लिहावं.

---------------------------------------------------------------------------------------
वर्ष: डिसेंबर 2006
वेळ: सकाळी 6
स्थळ: पुणे विद्यापीठ मुख्य दरवाजा
मी, विपुल, सचिन, रुपेश, एच.डी.प्रदीप, राजीवकुमार सिंग, सुमित पाल, ... चार वेगवेगळ्या भाषा बोलणारी आम्ही सहा डोकी एकत्र जमून, येऊ घातलेल्या एन्ड्युरन्स रेसमध्ये भाग घेण्याचे, त्यामध्ये जिकंण्याचे, आणि त्यांच्या तयारीचे मनसुबे आखतोय.

साधारण 60 किलोमीटर सायकलिंग, 50 किलोमीटर ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग असं या रेसचं स्वरुप. प्रत्येक जण आपापल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये केलेल्या साहसांचे, बायकिंगचे, ट्रेकिंगचे एकसे बढकर एक किस्से ऐकवून, केव्हातरी शाळेमध्ये एथलेटिक्स मध्ये जिंकलेल्या काही बक्षीसांच्या आठवणी सांगून, किंवा नुकत्याच मॅरेथॉन मध्ये पूर्ण केलेल्या चॅरिटी रनचा दाखला देऊन आपापला फिटनेस निदान तोंडी तरी सिद्ध करायच्या प्रयत्नात.

एवढी सगळी चर्चा झाल्यावर, आम्ही ठरवतो की आजच्या सरावाचा भाग म्हणून विद्यीपीठामध्ये जॉगिंग करुयात. उत्साहामध्ये आम्ही निघतो आणि सहा जण मिळून सहा किलोमीटर सुद्धा न पळता, हळूच विद्यापीठातल्या ओपन कॅंटीनकडे मोर्चा वळवतो. आपापल्या फिटनेस बद्दलचे सर्व समज-गैरसमज आता फिटलेले असतात. आम्ही ऑफिसमध्ये परत येतो आणि जणू काही घडलंच नाही अशा थाटात कामाला लागतो. रेसचा विषय केव्हाच बाजूला पडतो.

मधल्या काळात आम्ही सर्व जण नियमितपणे व्यायाम करायचं, जिमला जायचं ठरवतो. त्यानुसार प्रत्येक जण घराजवळच्या जिमला देणगी देऊन येतो. (देणगीच म्हणायची. कारण फी भरली, तर जिमला जातात ना लोक!)
---------------------------------------------------------------------------------------

वर्ष: डिसेंबर 2007
वेळ: दुपारी 1.
स्थळ: ऑफिसची पॅन्ट्री
गेल्या वर्षींच्या एन्ड्युरन्स रेसचं पोस्टर पॅंन्ट्रीमध्ये पुन्हा लागलेलं असतं. आम्ही सगळे अगदी सोयीस्करपणे ते टाळून आणि त्या विषयावर बोलायचंही टाळून जेवतो. एक नवीनच ग्रुप, टोळकं करुन, त्या पोस्टरभोवती जमून, रेसमध्ये भाग घेण्याचं आणि त्याच्या सरावासाठी युनिव्हर्सिटी गेटजवळ भेटायचं ठरवत असतो.


तर असं हे फिटनेसचं चित्र. चित्र काही नवीन नाही आणि अनपेक्षित पण नाही. दिवसातले 10 तास एकाच जागी, खुर्चीवर एकाच ठिकाणी, एकाच स्थितीमध्ये बसून घालवल्यावर दुसरी काय अपेक्षा ठेवणार? हल्ली सर्व डॉक्टर्स, फिटनेस तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ यांच्यामुळे फिटनेसचा विषय ऐरणीवर आला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर होणारे परिणाम आणि ते टाळण्यासाठी जीवनशैलीमध्येच गरजेचा असणारा बदल, याची चर्चा आपल्या कोणालाच नवीन नाही. 10 तास संगणकावरचं काम, त्यानंतर चारचाकी वाहनातून घर, थोडंफार जेवण, आणि झोप ही अशी जीवनशैली तुमच्यातला स्टॅमिना कसा टिकवून ठेवू शकेल?

आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्यांना तरुण वयामध्ये उद्भवणारा हृदयविकार, डायबेटिस हे सगळं आता ठळकपणे समोर यायला लागलंय. आणि म्हणूनच, ह्युमन रिसोर्स आणि वर्क एनव्हायरमेंट चा एक भाग म्हणून अनेक सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये हल्ली स्वतःचं जिम असतं. उत्तम रिसोर्स आपल्याकडे यावा, यासाठी, जी अनेक आमीषं दाखवली जातात, त्यातलंच एक म्हणजे “जिम” ची सुविधा. संपू्र्णपणे अद्ययावत साधनांनी सुसज्ज असलेलं हे जिम असतं, यात तिळमात्र शंका नाही. पण कित्येक वेळा या जिमचा वापर जेमतेम 5% लोक करतात. कधी कधी वाटतं, ऑफिसमध्येच असणारा स्वीमिंग पूल, जिम यामुळे या कंपन्या एम्लॉई ला जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी बांधून तर ठेवत नाहीत ना? “ऑफिसमध्येच जिम आहे, केव्हाही जाता येईल”, असा विचार करुन आम्ही बराच वेळ काम करत राहतो आणि मग अशी वेळ येते, की शरीर थकून जातं आणि जिमला जावंसं; वाटत नाही.




(इन्फोसिस जिम, मैसूरे)

हे झालं कामाच्या दिवसांचं. आमचा पाच दिवसांचा आठवडा. म्हणजे शनिवार-रविवार सुट्टी. मग निदान वीकएन्ड तरी स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायला काही हरकत नाही, असं वाटणं सहाजिक आहे. पण मग होतं काय की we just wanna chill out on weekends, you know!

मग चिल करण्यासाठी मित्रांबरोबर अलिबाग, दिवे-आगर, किंवा असंच कोणतातरी बीच गाठला जातो. संपूर्ण आठवडाभरात केलेल्या भारंभार कामामुळे आलेला मानसिक थकवा घालवणं, स्वतःला unwind करणं हे इतकं महत्वाचं वाटतं, त्याच्यपुढे कोणतीची फिजिकली टॅक्सिंग एक्टिव्हीटी करणं नको वाटतं आणि मग पुन्हा सोमवार येतो.


हे झालं सुमारे 80% लोकांचं चित्र ! पण 20 % चित्र याच्या बरोबर विरुद्ध आहे. पुणे, बंगलोर सारख्या आय.टी. हब्स मध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जन्माला आलेले वेगवेगळे adventure clubs, trekking groups यामध्ये भाग घेणाऱ्या लोकांमध्ये, आय.टी. तल्या लोकांची संख्या लक्षणीय असते. फक्त ती आय.टी.मध्ये काम करणाऱ्या एकूण मनुष्यबळाच्या प्रमाणात नगण्यच म्हणायला हवी. जिमच्या बंद वातावरणात व्यायाम करण्यापेक्षा बरीचशी मंडळी बाहेर जाऊन रिव्हर राप्टिंग, व्हॅली क्रॉसिंग, र्रपलिंग, क्लायंबिंग, ट्रेकिंग सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणं जास्त पसंत करतात.

शेवटी उत्तम जीवनशैली, उत्तम राहणीमान, कुटुंबियांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा, मुलांसाठी उत्तम प्रकारमचं प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च शिक्षण, दैनंदिन आयुष्य सुकर करण्यासाठी उत्तमोत्तम प्रकारची गॅजेट्स, जगाच्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी सुरू असलेली ही धडपड आणि त्यासाठी आय.टी. सारख्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची तुम्ही केलेली निवड. हे सगळं मान्य आहे. पण मित्रांनो, विचार करायला हवा. सर सलामत तो पगडी पचास. ऑपरेटिंग सिस्टीम उत्तम असणं गरजेचं, नाहीतर नवीन कोणत्याही सॉफ्टवेअरचं इन्स्टॉलेशन फेलच होणार. त्यामुळे, जिमला जाऊ, टेकडीवर जाऊ, मित्रांबरोबर फिरायला जाऊ, वीकएंडला ट्रेक्स ला जाऊ आणि फिट राहू.

शेवटी ऑफिसच्या कामामध्ये आपण किती इफेक्टिव्ह आहोत आणि किती यशस्वी आहोत, यावरुन आपण आयुष्यामध्ये किती यशस्वी आहोत हे नाही ठरवता येणार ना. हे दोन वेगळे विषय आहेत आणि या विषयांना वेगळं काढायला शिकायलाच हवं. वॉट से ?

फ्रेशर, सिंगल, हॉस्टेलाईट!

मंदार आला की सर्वांनी मिळून स्मोकिंग जोज मध्या पिझ्झा टाकायला जायचं असं ठरलेलं असल्याने, सगळे जण मंदार येण्याची वाट बघत होते. तशी टीममधल्या सर्वांचीच आपापल्या अप्रेझल्स बद्द्ल सविस्तर चर्चा करुन झालेली होती. आणि तीही अगदी सावधपणे... कंपनीच्या confidentiality च्या पोलिसीला धक्का लागणार नाही याची काळजी घेत... स्वतःच्या मूळ पॅकेजच्या आकड्याचा उल्लेख कुठेही होऊ न देता.
मंदार आणि वेणूगोपाल यांना मीटिंग रुममधून बाहेर येताना सर्वांनी पाहिलं. वेणूगोपाल अर्थातच अपेक्षेनुसार नेहमीसारखं अफेक्शनेट स्माईल देत आपल्या केबिनकडे गेला. त्याच्या चेह्र्यावरचा उत्साह नेहमीप्रमाणेच आज सुद्धा सर्वांना लांबूनच तरोताजा करुन गेला.

“Venu has some charisma in his personality yar!”---- इति निरंजन

“अरे वेणूको छोड... अपने भिडू को देखा क्या”... विवेकानंद

“झालं. गंडलं इथेच सगळं... मला वाटलंच होतं की मंदार असा तोंड पाडून बाहेर येणार”....रेवा

मंदारच्या चेहऱ्यावची निराशा आणि निरुत्साह कोणाला लांबून सुद्धा लपला नाही. आपल्या क्युबिकलकडे येण्याच्या ऐवजी, हातात एन्ह्वलप तसंच घेऊन, मंदारने आपला मोर्चा जेव्हा सरळ पॅन्ट्रीकडे वळवला, तेव्हा आपल्या पिझ्झा पार्टीचा बोर्या वाजणार असल्याची शंका प्रत्येकाच्या मनात डोकावून गेली. बोललं कोणीच काही नाही.

विवेकानंद, स्टीव्ह, रेवा, निरंजन, आणि भानूदास... सगळे पॅन्ट्रीकडे निघाले. निरंजन ने आपल्या स्कौर्पिओची किल्ली उचलली. पॅन्ट्रीमध्ये पोचले तेव्हा मंदारने कौफीचा एक भला मोठा टंपर already भरुन घेतलेला होता. मायक्रोव्हेव मध्ये चांगलं अर्ध मिनिटभर त्याने तो टंपर तापवला आणि फुंकरही न मारता त्यातला एक गरमागरम घोट घशाखाली रिचवला. हे सगळं होईपर्यंत कोणीच काही बोललं नव्हतं.

“ए चल यार... निकलते हे. Its already late...” भानूच्या या उद्गारावर, “I think I have got a raw deal” असं वाक्य मंदारनं फेकलं. खरं म्हणजे येत्या annual focal मध्ये मंदारचा निकाल हा असाच लागणार हे तसं सर्वांनाच अपेक्षित होतं. मंदारची सुद्धा तशी तयारी असायला हरकत नव्हती. पण तरी त्याचं हे वाक्य ऐकून कोणालाच काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेना.



“ऐका ना.. आपण हे सगळं Smoking Joes मध्ये जाऊन बोललो तर नाही का चालणार. Lets move fast. परत 2.30 वाजता status meeting आहे...”

रेवाच्या या बोलण्यावर, “तुम सब लोग जाओ यार. मला आजिबात मूड नाहीये...”
इतकंच बोलून मंदार निघून गेला.
जाता जाता... “ओके. हम सब लोग जोज मो हे... 2.15 पर्यंत केव्ही यावंसं वाटलं, तर जस्ट स्नॅप इन... “
असं निरंजननं मंदारला ओरडून सांगितलं आणि सर्व जण गाडी काढून जोज मध्ये पोचले.

---------------------------------------------------------------------------------------
मदार देवस्थळी.
वयः 25
स्मार्ट, हुशार, सौफ्टवेअर इंजिनियर. सॉरी.. सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर. गेली चार वर्षे सातत्याने उत्तम परफॉर्मन्स दाखवणारा प्रॉमिसिंग एम्प्लॉई.
इंजिनियरिंग कॉलेजमधून बाहेर पडण्यापूर्वीच कॅम्पस इंटरव्ह्यूमधून हातात जॉब आला होता. फ्रेशर म्हणून जॉईन झाला आणि चार वर्षांतच सिनियर इंजिनयर होऊन बसला. इथपर्यंतचा प्रवास ठीक होता, पण त्याच्या मॅनेजरनेच त्याला सांगितल्यानुसार आता मात्र त्याच्याकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. ज्या वेगाने तो इथपर्यंत आला, त्याच वेगानं पुढे जाणं अवघड ठरणार होतं.

नवीन होता तेव्हा हुशार असण्याच्या जोडीलाच तीन अजून खूप महत्वाचे गुण मंदारकडे होते.
तो फ्रेशर होता.
तो सिंगल होता.
तो लोकलाईट नव्हता.

फ्रेशर होता, त्यामुळे कामामधलं नाविन्य त्याला सतत खुणावत होतं. स्वतःला प्रुव्ह करावंसं वाटत होतं.
सिंगल होता त्यामुळे त्याची संपूर्ण संध्याकाळ मोकळी होती.
लोकलाईट नव्हता त्यामुळे घरी लवकर जाण्याची घाई नव्हती. औफिसमध्येच ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत सगळं काही फ्री औफ कॉस्ट मिळणं ही त्याच्या दृष्टीने अजूनच फायद्याची गोष्ट होती.
त्यामुळे सकाळी उठून काही बेसिक कामं उरकली, की औफिसमध्ये रुजू व्हायचं आणि रात्री डिनर करुनच घरी जायचं असा त्याचा दिनक्रम होता. टीममधल्या इतर मेंबर्सपेक्षा जास्त


वेळ ऑफिसमध्ये थांबणं त्याला अनेक कारणांमुळे शक्य होतं. त्यामुळेच 3-4 वेळा us मधले काही कस्टमर इश्यूज सोडवताना मंदारने रात्री उशीरापर्यंत थांबून खूप महत्वाची जबाबदारी उचलली. मंदारचं काम एकदम सर्वांच्या नजरेत भरायला लागलं. फ्रेशर म्हणून फक्त 3 लाखाच्या पॅकेजवर जॉईन झालेल्या मंदारचा पगार चार वर्षांमध्ये एकदम तिपटीने वाढला.
-------------------------------------------------------------------------------------
मंदार आता 4 वर्ष एकाच प्रॉजेक्टवर काम करतो आहे. या वर्षी त्याची engagement झाली आहे. या वर्षी त्याने स्वतःचे घर पण घेतलं आहे आणि आई-वडिलांना नाशिकवरुन इकडे बोलावून घेतलं आहे.
म्हणजेच...

आता तो फ्रेशर नाही.
आता तो सिंगल नाही.
आता तो लोकलाईट आहे.


स्मोकिंग जोज मध्ये सगळे पोचले तेव्हा 1.30 वाजले होते. पण टेबल बुक केलेलं होतं आणि रेवानी नेहमीसारखाच स्मार्टपणा दाखवून ऑर्डर सुद्धा देऊन ठेवलेली होती. त्यामुळे they could get started immediately.

“मंदारचं यावेळी अगदीच गंडलेलं दिसतंय रे...” विषय कोणी काढायचा याची सर्वच जण वाट बघत होते. पण पिझा आणि गार्लिक ब्रेडचा एक एक घास पोटात गेल्यानंतर इतका वेळ शांत असलेल्या स्टीव्हनेच विषय काढला.

“हं. अरे पर ये ता होना ही था ना.... he was not up to the mark यार...” भानूदास म्हणाला

“Upto the mark म्हणजे काय म्हणायचंय रे तुम्हा लोकाना? मला तर वाटतं. मंदारच्या परफॉर्मन्स मध्ये काहीही कमी नव्हती. तो जॉईन झाल्यापासून अगदी consistently चांगलंच काम करतो आहे. त्याच्या काही पर्सनल गोष्टींमुळे तो आता ऑफिसमध्ये रात्री उशीरापर्यंत थांबत नाही इतकंच. पण तुम्ही किती वेळ ऑफिसमध्या थांबता त्यापेक्षा तुम्ही किती output देता हे महत्वाचं ना”--- रेवा ची मतं या बाबतीत ठाम होती.

“बरोबर आहे यार... पर ऐसा होता नहीं ना... जो लोक देर तक रुकते हे.. उनका अप्रेजल अच्छा होता है...उनको अवॉर्ड मिलता हे... ये सब देखके तो ऐसाही लगतो है ना, की it is expected that you stay back late.”--- भानूदासने दुःख व्यक्त केलं.

“हो.. च्यायला मला तर वाटतं... आपल्याकडे हे फ्लेक्झि टाईम आहे ना.. ते उलट्याच बाजुने आहे. लोकाना वाटतं, यांचं बरं आहे. काधीही या कधीही जा. पण आपल्याला माहीती आहे ना खरं काय आहे ते.” ---निरंजन

“That apart...पण मंदार was really upset. अरे वो भी एक ही प्रोजेक्ट पे चार सालसे काम कर रहा हॅ...आता त्याला संपूर्ण माहिती आहे in and out. त्यामुळे he need not invest so much time on that product. वेणू ला हे कळत नाही का....”.. विवेकानंद.

“पण या सगळ्याच्या उपर मला एक वाटतं. किती पगार असेल रे मंदारचा? 10 लाख नक्कीच. किती पगार मिळाला की याचं समाधान होणार आहे? माझ्या मते आपल्या इंडस्ट्रीतला प्रत्येक जण.. including all of us हावरट झाला आहे. असो. तो विषय वेगळा आहे.”--- रेवा.

“So, should we conclude... की फ्रेशर आणि सिंगल असणं आणि मुख्य म्हणजे लोकलाईट नसणं, या गोष्टीxचा शक्य तितका फायदा सुरुवातीच्यात दिवसांमध्ये करुन घ्यावा...” स्टीव्ह चा सवाल…

After all we belong to the sunrise industry and we all are making hay while the sun shines!”---

Column in Saptahik Sakal

माझ्या एका नॉन-आय.टी. वाल्या मित्राच्या भाषेत सांगायचं, तर हे सगळे सॉफ्टवेअरडे किंवा कॉम्प्युटरडे किंवा आय.टा.डे रिकामटेकडे आहेत. म्हणूनच त्यांना इतकं सगळं महागडं शॉपिंग करायला, इतक्या ठिकाणी आऊटिंगला जायला आणि असंच काय काय करायला वेळ मिळतो. या आय.टी. बद्दल असे टोकाचे विचारप्रवाह दिसतात.

एक आय.टी.ला संपूर्ण विरोध करणाऱ्यांचा. हा प्रवाह म्हणतो, की या क्षेत्रामुळे आपण आपली identity हरवली. या क्षेत्राने आपल्याला चैनीची सवय लावली. आपली संस्कृती विसरायला लावली आणि आपण पाश्चिमात्यांच्या संपूर्णपणे आहारी गेलो.

दुसरा प्रवाह आय.टी.चा संपूर्ण पुरस्कार करणाऱ्यांचा. हा प्रवाह म्हणतो, की आय.टी.मुळे आपण आधुनिक झालो. आपल्याला जगाची आणि जगाला आपली ओळख झाली. मध्यमवर्गाला पुन्हा एकदा चांगले दिवस आले. जगाच्या नकाशावर भारताचं अस्तित्व या काळात आय.टी. मुळेच पुन्हा एकदा जाणवू लागलं.

हे दोन्ही विचार खरं म्हणजे एकच गोष्ट सांगतात. ते परस्पर विरोधी नाहीतच. कारण तंत्रज्ञान विकसित होतं त्यामुळे सपाटीकरणाची प्रक्रिया जोम धरते. जितका जास्त जगाशी संपर्क येतो, तितकी जास्त देवाण-घेवाण होते आणि मग स्वतःचं वेगळं काही बाळगणं मुश्कील होऊन बसतं. जसं शाळेत एकदा गेलं, की शाळेचा गणवेष घालणं अपरिहार्य असतं. आपण एकटेच गणवेश न घालता, आपल्याला हवा तो पोशाख करुन जाऊ शकत नाही. तसंच आहे हे. या बद्दल खूप सविस्तरपणे पुढच्या लेखांमध्ये बोलूच. पण त्यापूर्वी मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे आय.टी. क्षेत्राच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा गोषवारा...

तरुणाई
या इंडस्ट्रीचं तरुण वय तर कोणापासूनही लपलेलं नाही. भारतात या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळाचं सरासरी वय आहे केवळ 26 वर्ष. पारंपरिक क्षेत्रांमध्ये एखाद्या कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचं वय कमीतकमीत 50 असणं गरजेचं. कारण कदाचित ही सर्व क्षेत्र अनुभव आणि गुडविल च्या जोरावर चालणारी असावीत. पण या क्षेत्रामध्ये मात्र अनुभवापेक्षाही नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानाची झेप कुठवर जाईल याची दृष्टी असणं गरजेचं. आणि ती दृष्टी असण्यासाठी वयाची कोणतीच बंधनं लागू होत नाहीत. गुगल हे याचं सर्वोत्तम उदाहरण सर्वज्ञात आहेच.

अनौपचारिकता
कपड्यांमधली, वातवरणातली, एकमेकांशी संवाद साधण्यामधली अनौपचारिकता हे तर या क्षेत्राचं ठळक लक्षण. आपल्या कंपनीच्या प्रेसिडेंटपासून ते ऑफिसबॉयपर्यंत सर्वांना केवळ पहिल्या नावाने हाक मारणे, अरे-तुरे करणे हाच इथला नियम. शिवाय संवाद साधण्याची भाषा प्रामुख्याने इंग्लिश. त्यामुळे मराठी किंवा इतर भाषांसारखं आदरार्थी संबोधन नाहीच मुळी. केवळ you नेच काम होतं. तुम्ही असं म्हणायची गरजच भासत नाही. संवादामधून अशी जवळीक आली की मग तिथूनच कोणताही विषय कोणाशीही मोकळेपणाने बोलण्याचं धाडस आपोआप येतं.
ऑफिसच्या वातावरणातली अनौपचारिकता आणखी वेगळीच. काचेच्या बंद दरवाज्या पलिकडे बसणारी, मोठ-मोठ्या हुद्द्यांवर असल्यामुळे एक प्रकारचं वलय असणारी माणसं इथे अगदी मोजकीच. तुमच्या प्रोजेक्टचा लीड किंवा तुमचा मॅनेजर सुद्धा तुमच्याच शेजारी, तुमच्या सारख्याच क्युबिकल मध्ये बसतो. तेव्हा तो कोणी वेगळा वाटतच नाही.
अजून एक डोळ्यात भरेल असा अनौपचारिकतेचा भाग म्हणजे पेहरावामधला बदल. कॉर्पोरट कल्चरला आय.टी. मुळे नवीन ड्रेस कोड मिळाला. (खरं तर ड्रेस कोड पासून छुटकारा मिळाला) नवीन कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जीन्सवरचा इनफॉर्मल वेअरचा शिक्का जाऊन त्याला बिझनेस कॅज्युअल ची मान्यता मिळाली. त्यामुळेच अंगावर जीन्स, टी-शर्ट, पाठीवर सॅक असा अगदी कॉलेजियन पेहराव या क्षेत्रामध्ये सर्रास दिसतो. वर सांगितल्याप्रमाणे तुलनेने तरुण वयामुळेसुद्धा हा पोशाख पॉप्युलर झाला असावा. कितीतरी जणांचं म्हणणं असं, की रात्री घरी केव्हा परत जायला मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे अगदी रात्रभर ऑफिसमध्ये रहावं लागलं, तरी तितकाच सोयीस्कर होईल असा पोशाख घालणं सर्व जण पसंत करतात.
नर्डस
पाठीवर वाढवलेले केस, त्याचा बांधलेला एक पोनी, वाढलेली दाढी, अंगावर ढगळ असा मळकट -रंगाचा टी-शर्ट आणि खाली तशीच खाकी किंवा मातकट रंगाची शॉर्टस असा अवतार काही वर्षांपूर्वीपर्यंत, कलात्मक समजल्या जाणाऱ्या जाहीरात क्षेत्रामधल्या क्रिएटिव्ह डायरेक्टर्स किंवा आर्ट डायरेक्टर्सची मक्तेदारी होती. पण आय.टी. मधले टिपिकल नर्ड्स सुद्धा या अशा वैचित्र्यामध्ये मागे नाहीत. नर्ड म्हणजे अशी जमात जी केवळ सबस्टन्स वर विश्वास ठेवते. कोणत्याही प्रकारच्या औपचारिकतेला – मग ती हुद्द्यामधून आलेली असेल, कपड्यामधून आलेली असेल किंवा तुमच्या भाषेमधून आलेली असेल – नर्ड्सचा विरोध असतो. ज्या ज्या पद्धतीने किंवा ज्या ज्या प्रसंगामध्ये स्वतःचं मार्केटिंग होईल ते ते सर्व प्रसंग नर्ड्स टाळतात. तर हे नर्ड कल्चर सुद्धा या आय.टी. मध्ये मोठ्या प्रमाणात वाढीस लागतंय.

आभासी स्थलांतर (virtual migration)
यु.एस. ही आय.टी. वाल्यांची पंढरी म्हणतात. त्यामुळे या क्षेत्रामधील करिअरच्या सुरुवातीच्या दोन-चार वर्षांतच कंपनीकडून यु.एस. ट्रीप पदरात पाडून घेणं हे इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचं आद्य ध्येय. अतिशय शॉर्ट नोटीसवर जगाच्या पाठीवर कुठेही जाण्यासाठी तयार असणारी माणसं हे या क्षेत्राचं अजून एक ठळक वैशिष्ट्य. आणि म्हणूनच आज आपल्या कुटुंबातला किमान एक जण तरी परदेशात कुठेतरी स्थायिक झालेला असतोच. हे झालं खरोखरच्या स्थलांतरचं. पण आय.टी.तलं काम म्हणजे आभासी स्थलांतरसुद्धा. स्वतःचं बायलॉजिकल क्ल़ॉक बदलून त्याला यु.एस. किंवा अशा इतर कोणत्यातरी निराळ्याच देशाच्या वेळा पाळण्याची सवय लावणं हे इथल्या लोकांना नवीन नाही.

श्रीमंती
पैशाची श्रीमंती हे तर आय.टी. चं सर्वाधिक चर्चिलं जाणारं आणि सर्वदूर पसरलेलं वैशिष्ट्य. यामध्ये अनेक मुद्दे येतात. तुम्ही काम करत असलेलं डोमेन, तुमच्या कंपनीचा साईज, स्टार्ट-अप्स मध्ये मिळणारे स्टॉक ऑप्शन्स, इतर इन्सेंटिव्ज इत्यादी अनेक.

ही झाली आय.टी.ची अगदी ठळक वैशिष्टय. या सर्वांशी निगडित कितीतरी गोष्टींबद्दल लिहायचा विचार आहे. सर्वांचा सहभाग आणि लिहील्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरचा प्रतिसाद यामधून ही लेखमाला अधिकाधिक रंजक बनत जाईल, अशी आशा आहे.

ऐटीत जगणारी माणसं ........Column in Saptahik Sakal

श्रावणातल्या कहाण्यांमधल्या आटपाट नगराच्या गोष्टी काळाआड गेल्या आहेत, कारण आता त्या आटपाट नगराची जागा आपल्याच शहरानं घेतली आहे. कहाण्यांमधलं ते आटपाट नगर जसं जुनं, आठवणीतलं, गोष्टींमध्येच शोभणारं, तसंच आपल्याला आठवणारं आपलं शहर, त्या शहरातली माणसं आता गोष्टींमध्येच शोभतील अशी. आपल्या या शहराची आठवण काही फार वर्षांपूर्वीची नाही. अगदी अलिकडची... म्हणजे साधारण 10 वर्षांपूर्वीची. पण तरीही शहरानं गेल्या दहा वर्षांमध्ये संपूर्ण कात टाकली आहे.
गल्लोगल्ली दिसणाऱ्या चार चाकी गाड्या, त्या गाड्यांमधून फिरणारी, एकाच प्रकारचे कपडे घालणारी, एकाच प्रकारची, कोणतीशी वेगळीच, भाषा बोलणारी, अगदी जाहीरातींमधून थेट शहरातल्या रस्त्यांवर आल्याप्रमाणं दिसणारी, सगळीकडे कमालीच्या आत्मविश्वासानं वावरणारी माणसं, पंचतारांकित शॉपिंग मॉल्सची आणि तिथे शॉपिंग करणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी, फ्लॅट्सचे गगनाला भिडलेले भाव आणि तरीही स्कीम लॉंच होण्याचा अवकाश- संपून जाणारं बुकिंग. ब्रॅंडेड कपड्यांची, ब्रॅंडेड फर्निचरची, ब्रॅंडेड जेवणाची, इन-फॅक्ट ब्रॅंडेड जीवनशैलीचीच लागलेली किंवा लागू पाहणारी सवय. हे सगळे बदल नजरेत भरतील इतके ठळकपणे समोर आले आहेत. अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोचले आहेत, गेल्या सात-आठ-दहा वर्षांमध्ये !
का बदललं इतकं सगळं, इतक्या झपट्याने ? मला वाटतं आपल्यातल्या प्रत्येकाला याचं उत्तर माहीती आहे. आय.टी. हा कळीचा शब्द जेव्हापासून मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये जाऊन बसला, तेव्हापासून हे सगळं घडायला सुरूवात झाली. आणि आजची स्थिती तर कोणालाही लपलेली नाही. असं म्हणतात, की पंजाबमध्ये घरटी एक माणूस सैन्यदलामध्ये असतो. तसंच महाराष्ट्रामध्ये घरटी एक माणूस आय.टी. मध्ये असतो असं म्हणता येईल. आय.टी. मध्ये काम करणाऱ्यांची आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचीच जीवनशैली – अगदी स्वयंपाकघरापासून ते कपड्यांपर्यंत उंचावली आहे. अगदी अनपेक्षितपणे आणि नकळत घडलेले हे बदल आता ठळक झालेत.
काय आहेत हे बदल ?
· पारंपरिक काळ्या कडप्प्याचं स्वयंपाकघर जाऊन मॉड्युलर किचन आलं.
· फ्रिजम्ध्ये लो-कॅलरी फुड आयटम्स आले.
· मंडईमधून आणलेल्या भाज्यांपेक्षा स्पेन्सर्स, रिलायन्स फ्रेशिज, किंवा मोअर मधून आणलेल्या, निवडलेल्या, ब्रॅंडेड भाज्याच घरामध्ये येऊल लागल्या.
· बाथरुम्स मध्ये हॉट आणि कूल शॉवर्स, आणि बाथ टब्स या गरजा बनल्या.
· लिव्हींग रुममध्ये इटालियन फर्निचर आलं.
· फ्रेंच विंडोज आल्या.
· पार्किंगला स्मॉल कारशिवाय शोभा येईनाशी झाली.
· नवरा-बायको दोघांनाही कारची गरज भासू लागली. एक कार पुरेनाशी झाली.
· त्या स्मॉल कारमध्ये सोनी चे स्पीकर्स आणि म्युझिक सिस्टिम आली.
· स्वतःच्या नोकिया एन सिरीज चा चार्जरही कारमध्ये आला.
· किमान एक आय पॉड स्वतःकडे असणं गरजेचं झालं.
· कपाटात--- सॉरी वॉर्डरोबमध्ये लिव्हाईज, ली, स्पायकर च्या जीन्स, रीबॉक, आडिडास, मंत्रा चे टी-शर्ट्स आणि काही ब्रॅंडेड फॉर्मल्स अनिवार्य झाले.
· शहरातल्या किमान एका तरी जिम किंवा क्लबची मेंबरशिप मस्ट झाली.
· मद्यपान करणे हे पाप समजलं जाणाऱ्या घरांमध्ये सोशल ड्रिंकिंगला मान्यता मिळाली, किंबहुना तो स्टेटस सिंबॉल समजला जाऊ लागला.
· मुलांच्या प्री-नर्सरीच्या नावावरुनच जणू त्यांच्या पुढच्या करिअरचं मोजमाप होऊ लागलं.

चैनीच्या, ऐषारामाच्या सर्व गोष्टी गरजा बनत गेल्या. ऐटीत जगण्याची सवय लागली. कारण आय.टी. मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ही ऐट परवडायला आणि सोसायला लागली. ही सगळी “ऐटीत जगणारी माणसं” झाली.

100 वर्षांपूर्वी केशवसूतांनी एक कविता लिहीली होती. संपूर्ण जगामध्ये लीलया संचार करण्याचं, दिशा-काळ-वेळेचं बंधन झुगारुन त्या पलिकडची सृष्टी पाहू शकण्याचं सामर्थ्य कवी नावाच्या प्राण्यामध्ये आहे असं सांगणारी ही कविता होती. मला वाटतं, ही कविता आजच्या काळात तंतोतंत लागू पडते आहे, ऐटीत जगणाऱ्या या माणसांना....

आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके
देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळावया
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहींकडे लीलया
दिक्कालातून आरपार आमुची दृष्टी पहाया शके

तर अशा या ऐटीतल्या माणसांबद्दल सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न, अनेक शंका, क्वचित मत्सर, क्वचित कीव, क्वचित अभिमान, क्वचित उत्सुकता असं बरंच काही आहे. सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा म्हणजे नक्कीच खूप हुशार – अगदी जिनियस - असा समज काही वर्षांपूर्वीपर्यंत होता. पण आता लोकांचा तसा समज नाही. कारण या क्षेत्रामध्ये संधी वाढल्या आणि मोठ्या संख्येने मनुष्यबळ या क्षेत्रामध्ये येऊ लागलं. त्यामुळे हळूहळू लोकांच्या हे लक्षात आलं, की जिनियस असणं ही गरज इथे नाही. परंतु माहीतगार असणं ही गरज मात्र आहे. त्यामुळे या क्षेत्रामधल्या शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आकर्षिले गेले आणि मग सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्यांची एक मोठी फळीच तयार झाली.

एम्प्लॉयमेंट एक्सेंजमध्ये रांगा लावण्याचा काळ आणि गरज केव्हाच मागे पडली. कारण सॉफ्टवेअरच्या या जादुई दुनियेतल्या कोणत्याही एका कुलुपाची चावी तुमच्याकडे असल्याचं तुम्ही जाहीर करायचा अवकाश – संधी तुमच्याकडे चालून येऊ लागल्या. संगणकाच्या क्षेत्राने भारतामध्ये जोम धरला ते साधारण 90 च्या दशकामध्ये. डॉट कॉम हा शब्द आणि त्याबरोबरच इंटरनेट नावाची एक नवीन दुनिया या काळात आपल्याला खुली झाली. मोठ-मोठ्या शहरांमध्ये डॉट कॉम कंपन्यांचे बॅनर्स दिसू लागले आणि शहरांमधल्या मुख्य रस्त्यांवर इंटरनेट कॅफेज दिसू लागले. काय आहे इंटरनेट, काय करतात डॉट कॉम कंपन्या, आपण वेब ब्राऊजिंग केल्यामुळे त्यांना पैसे कसे मिळतात, या कंपन्यांचं नेमतं Revenue Model काय, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. पण त्या सर्वांची उत्तरं मिळायच्या आतच हा डॉट कॉम चा फुगा फुटला. 1990 च्या दशकामधलं डॉट कॉमचं वारं अगदी सामान्य माणसांपर्यंत पोचलेलं नव्हतं. त्यामुळे डॉट कॉम चा फुगा फुटल्यानंतरची झळसुद्धा अगदी वैयक्तिक पातळीवर तशी मोठ्या प्रमाणावर बसली नाही. पण 1999 नंतर आलेली आय.टी.ची लाट मात्र वेगळीच होती. डॉट कॉम च्या अपयशाबद्दलचे तपशील माहीत नसले, तरी ढोबळ मानाने संगणकाच्या क्षेत्राचं काही खरं नाही इतपत माहीती सामान्य माणसांना होती. त्यामुळे सुरूवातीला या क्षेत्रामध्ये जायला तसा सामान्य माणूसही कचरत होताच.

पण इन्फोसिस, विप्रो सारख्या भारतीय कंपन्यांनी डॉट कॉम चा बोळा काढला आणि पाणी वाहतं झालं. आऊटसोर्सिंगच्या गणितामुळे भारताला होऊ शकणाऱ्या फायद्याची झलक या कंपन्यांनी दाखवली मात्र- अनेक हुशार लोक या क्षेत्राकडे केवळ नोकरीची संधी म्हणूनच नाही तर एक आव्हान म्हणूनही बघू लागले. कुठेच काहीच घडत नसल्याची तक्रार करणाऱ्या मध्यमवर्गाला, आपल्याकडे असलेलं कष्टाचं आणि शिक्षणाचं भांडवल वापरुन यश मिळवण्याचा मार्ग सापडला आणि मग सगळं चित्रच बदललं.

माझी पिढी या सगळ्या बदलांची साक्षीदार असणारी. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठीपणापासून ते कॉस्मो कल्चर पर्यंतचा प्रवास माझ्या पिढीने नकळतपणे केला. आता दहा वर्षांनतर हे सगळं बरंचसं स्थिरस्थावर झालं आहे. अंगवळणी पडलं आहे.

मी देखिल गेली पाच वर्ष रोज 12 तास आय.टी. च्या फाईव्ह स्टार वातावरणात घालवते आहे. आजुबाजुचे लोक, नातेवाईक, इतर नॉन-आय.टी. वाले मित्र यांच्या प्रश्नांना, शंकाना, उत्सुकतेला, कधी कधी कौतुकभरल्या नजरेला तोंड देते आहे. मग लक्षात यायला लागलं, की हे जे सगळं घडतंय ते सर्वांनाच काहीतरी नवीन, निराळं वाटतंय. म्हणून लिहावंसं वाटलं. कोणत्याही आय.टी. कंपनीच्या ऑफिसमध्ये मध्ये दररोज घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी – मधुर भांडारकर च्या कॉंर्पेरेटच्या पटकथेमधून उचलल्यासारख्या -, आय.टी. मधल्या लोकांची बदलत चाललेली भाषा, हाती लवकर आलेल्या परचेसिंग पॉवर मुळे त्यांच्या कुटुंबामध्ये झपाट्याने होणारे बदल, नातेसंबंधांमध्ये होणारं परिवर्तन... असं बरंच काही टिपून ठेवावं असं वाटलं. हे सगळं नोंदवून ठेवावंसं वाटण्याचं कारण असं, की संवाद-माध्यमांमध्ये (कम्युनिकेशन मिडिया) ज्या ज्या वेळी काही मोठे बदल झाले त्या त्या वेळी त्या काळातली एक पूर्ण पिढी त्या वेळच्या समाजाची जीवनशैली बदलवून टाकायला कारणीभूत ठरली. संवाद-माध्यमांमधली क्रांती रोज होत नाही. म्हणूनच ती जेव्हा होते, तेव्हा तिचे परिणाम मोठ्या प्रमाणावर असतात.

हे सगळे परिणाम वृत्तान्ताच्या स्वरुपात लिहावेत असं वाटलं. बुलेटिन बोर्ड सारखे.
आय.टी. बुलेटिन बोर्ड म्हणजे या क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्या व्यावसायिक संधीची माहिती नाही किंवा भारतामध्ये नव्याने येऊ पहाणाऱ्या नवनवीन कंपन्यांची माहिती देण्याचाही उद्देश इथे नाही. हा प्रयत्न संपूर्णपणे इथे काम करणाऱ्या माणसांचं मनोगत मांडण्याचा. पण तरीसुद्धा ही लेखमालिका म्हणजे आय.टी.मध्ये काम करणाऱ्या माणसांची कैफियत किंवा त्यांच्या कष्टाची कहाणी, किंवा गार्हाणं नाही. त्याचबरोबर, आय.टी. ला विनाकारण महत्त्व देऊन इथे काम करणाऱ्या सर्व ऐटीतल्या माणसांना कुठेतरी एक्स्ट्रा-ऑर्डिनरी बनवण्याचाही उद्देश नाही.

याला वृत्तान्त म्हणता येईल. या इंडस्ट्रीमध्ये काम करताना जे जसं दिसतं, जे नवीन जाणवतं, वेगळं वाटतं, ते तसंच्या तसं शेअर करण्याचा प्रयत्न.

इथून पुढच्या लेखांमध्ये काही प्रसंग, काही मजेशीर किस्से, काही अनुभव असं सगळं येईलच. पण तत्पूर्वी बुलेटन बोर्डच्या पुढच्या भागात, या इंडस्ट्रीच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा एक गोषवारा घेऊयात.